कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे सर्वच पिकांच्या दरांवर मोठा परिणाम : काही पिके शेतातच पडून वाया जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त
सदानंद चव्हाण / कंग्राळी बुद्रुक
कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात भाजी मार्केटमध्ये ओल्या मिरचीचे दर गडगडल्यामुळे कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड परिसरातील शेतकऱयांना डोकीला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. कवडीमोल दराने मिरची खरेदी करून किरकोळ विक्री करणाऱयांची मात्र चांदी होत आहे. यामुळे मिरचीच नको या संतापाने गौंडवाड येथील युवा शेतकरी प्रकाश चौगुले यांनी आपल्या शेतातील भरघोस फळधारणा झालेल्या मिरचीची झाडेच उपटून टाकून प्रशासनाचा निषेध नोंदविल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मागील वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. याच महामारीत बिचाऱया शेतकऱयांवर भाजीपाल्याबरोबर इतर पिकांचे दर गडगडल्यामुळे कंगाल होण्याची वेळ आली आहे. कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड परिसरामध्ये उन्हाळी ओली मिरचीची भरपूर लागवड केली.. पिकेही भरघोस आली. आता थोडेफार पैसे पदरात पडणार अशी आशा असतानाच कोरोना महामारीचा संसर्ग वाढल्यामुळे बाजारपेठासह सर्वच लॉकडाऊनमुळे बंद ठेवाव्या लागल्यामुळे मार्केटमध्ये बाहेरगावाहून खरेदीदारच येत नसल्याने ओल्या मिरचीचा दर 30 रुपये 10 किलो झाल्यामुळे शेतकऱयांची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी कंगाल तर विक्रेते मालामाल
कोरोना काळात भाजीसह सर्वच पिकांचे दर गडगडल्याने विक्री करणार शेतकरी कंगाल तर भाजी विक्रेते मालामाल होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. कारण शेतकऱयांच्या पिकाचा भाजी मार्केटमध्ये कवडीमोल दर झाला. तरीही भाजी खरेदी करणारे दलाल व रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते मात्र मालामाल होत आहेत. मार्केटमध्ये वांगी 2 ते 3 रुपये किलो दराने खरेदी करून ते 30 ते 40 रुपये किलो दराने विक्री करत आहेत. मिरची 3 रुपये किलो दराने घेऊन 50 रुपये किलो दराने विक्री करत आहेत. शेतकऱयाला मात्र भाजी मार्केटपर्यंत आणताना टेम्पो भाडे व कमिशन वजा जाता हाती काहीच लागत नाही. यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु तसे न होत नसल्यामुळे शेतकऱयाला कंगाल होण्याची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
…अन् मिरचीची झाडेच उपटून टाकली
कोरोना महामारीमुळे ओल्या मिरचीचा दर गडगडल्यामुळे मिरचीचा 2 ते 3 रुपये किलो दर झाल्यामुळे मिरची रोप लागवड केल्यापासून ते लागवड होईपर्यंत केलेला खर्च पाहता ही शेती कशाला करायची या संतापाने गौंडवाड येथील एका युवा शेतकऱयाने एकरभर
शेतातील भरघोस पिकविलेली मिरचीची झाडे उपटून टाकून प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
खतांचे वाढते दर चिंताजनक
सध्या संपूर्ण देशभर कोरोना महामारीमुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोना महामारीचा विळखा पडून भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. पिकाला बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत आहे. भाजीपाल्याला रासायनिक खतांचे डोस दिल्याशिवाय पीक तरारून येत नाही. शेतकऱयांचा भाजीपाला कवडीमोल दराने खरेदी करणारे प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र या सर्व गोष्टीकडे कानाडोळा करत आहेत.
प्रशासनाने शेतकऱयांचा गांभीर्याने विचार करावा
कोरोना महामारीत खतांचे व औषधांचे दर कमी का होत नाहीत. प्रशासनाचा हा दुजाभाव का, किरकोळ भाजी विक्री करणाऱयांची मात्र चैनी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन याचा गांभीर्याने विचार करेल काय, असे मत जाणकार शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
प्रशासनाचा आंधळा कारभार चव्हाटय़ावर

कोरोना महामारीच्या नावाखाली भाजीपाला व मिरची पिकाचे दर कवडीमोल झाल्याचे दिसून येत आहे. पण, या कोरोना महामारीत रासायनिक खते व औषधांचे दर वाढत आहेत. यावरून प्रशासनाचा आंधळा कारभार चव्हाटय़ावर आल्याचे दिसून येत आहे. काबाडकष्ट करून सर्वसामान्यांचे पोट भरणाऱया अन्नदाता शेतकऱयांची ही अवस्था आहे.
-वामन पाटील-युवा शेतकरी संघटना अध्यक्ष, गौंडवाड
मिरची दर अवघा 2 ते 3 रुपये प्रति किलो

कोरोनाच्या नावाखाली भाजी मार्केटमध्ये ओल्या मिरचीचा दर अवघा 2 ते 3 रुपये प्रति किलो झाल्याने संताप अनावर झाला. प्रशासन व कृषी खात्याचा निषेध करत मी माझ्या एकरभर जमिनीतील भरघोस लागवड झालेली ओल्या मिरचीची उभी झाडे उपटून टाकून संताप व्यक्त केला. प्रशासनाने शेकतऱयांना असे मारले तर पुढे असा एक दिवस येईल की सर्व शेतकऱयांनी अन्नधान्य व भाजीपाला पिकविणेच बंद केले तर सर्वसमान्यांची अवस्था काय होईल, अशीही संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
-प्रकाश चौगुले- युवा शेतकरी (गौंडवाड)