ऑनलाईन टीम / बर्लिन :
जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरातील कनव्हेंशन सेंटरजवळ सापडलेला 500 किलो वजनाचा दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन बनावटीचा बॉम्ब अग्निशमन दलाने शुक्रवारी निकामी केला. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी परिसरातील 2700 लोकांना दुसरीकडे हलविण्यात आले होते.

मंगळवारी फ्रँकफर्ट शहरात कनव्हेंशन सेंटरजवळ खोदकाम सुरू असताना हा 500 किलो वजनाचा बॉम्ब आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हा परिसर रिकामा करत प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केला. या परिसरातील 2700 लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा आदेश देण्यात आला होता. परिसरातील रुग्णांनाही इतर ठिकाणी हलविण्यात आले. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बॉम्ब तज्ज्ञांनी तो निकामी केला.
हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील होता. दुसऱ्या महायुद्धाला 75 वर्ष होऊनही जर्मनीत अशा प्रकारचे बॉम्ब आढळून येत आहेत. यापूर्वी 2017 मध्ये अशाच प्रकारे 600 किलो वजनाचा बॉम्ब आढळून आला होता. त्यावेळी 65 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. जानेवारी 2020 मध्ये 200 किलो वजनाचा बॉम्ब आढळून आला होता. तेव्हा 14 हजार लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले होते. तर जुलै 2019 मध्येही फ्रँकफर्ट शहरात 500 किलो वजनाचा असाच बॉम्ब आढळला होता. तो निकामी करण्यासाठी 16 हजार 500 लोकांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले होते.