प्रतिनिधी / रत्नागिरी :
शहराजवळील काळबादेवी येथील एका मच्छीमाराला आतापर्यंतची सर्वात मोठा सुमारे दीडशे किलोचा वाघळी मासा सापडला. विक्रीसाठी नेणाऱ्या छोट्या टेम्पोचा पूर्ण हौद त्या माशाने व्यापला होता. कोरोनामुळे या माश्याला दर मात्र कमी मिळाला. मात्र ही आतापर्यंतचा सर्वात मोठा वाघळी मासा असल्याचे समजते.
तौक्ते चक्रीवादळ सरून गेलं आणि मासळी समुद्रातून गायब झाली. छोटे मच्छिमार किनाऱ्यापासून काही अंतरावर मिळेल ते मासे पदरात पडून घरी परत येत आहेत. काळबादेवी येथील मच्छिमार संदेश मयेकर यांचं नशीब आज जोरावर होतं. सकाळी मिऱ्यापासून काही अंतरावर तांडेल निकेत मयेकर यांच्यासह ही नौका मासेमारी करत होती. चक्रीवादळ झाल्यामुळे फारसे मासे मिळत नव्हते त्यामुळे काही वेळ वाट पाहून ते माघारी यायला परतले. परत येताना जाळ टाकलं आणि अचानक जाळ्यात मासे लागल्याचं त्यांना जाणवलं. जाळ जड लागल्यामुळे त्यांना त्याच कुतूहल वाढलं. त्यांना ते जाळं पाण्याबाहेर ओढण्यास सुरुवात केली आणि नौकेतील मच्छिमाराच्या चेहरा फुलून गेला. मासळीची कमतरता असताना वाघळी माश्याची लाॅटरीच लागली होती. तो मासा पाण्याबाहेर काढला आणि ते किनाऱ्यावर धावले. एवढा मोठा मासा विक्रीला न्यायचा म्हणजे गाडीशिवाय पर्याय नव्हता. छोटा टेम्पो मागवला. आकाराने मोठी असलेली वाघळी त्या गाडीच्या हौद्यात टाकली. पूर्ण जागा त्या एका माशाने भरून गेली होती.