डॉ. अजय वैद्य यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / फोंडा
अभिनय ही क्रिया नसून प्रतिक्रिया आहे. श्रोत्यांच्या मनाला थेट भिडणारी ही कला प्रत्येक कलाकार जगत असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अजय वैद्य यांनी केले. श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ केरी या संस्थेने सादर केलेल्या सं. शारदा नाटकातील कलाकारांच्या गौरव सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरच्या हल्लीच झालेल्या राज्यस्तरीय महिला नाटय़ स्पर्धेत हे नाटक सादर करण्यात आले होते. गौरव सोहळय़ाला लेखक मुकेश थळी, श्री विजयादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष आनंद देसाई, विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाण, सचिव मनोहर देसाई हे व्यासपीठावर उपस्थित होते. सं. शारदा नाटकाचे दिग्दर्शक कमलाक्ष खेडेकर, अभिनयासाठी प्रथम पारितोषिक प्राप्त झालेली कृतिका जाण, संवादिनी वादनासाठी द्वितीय पारितोषिक प्रदीप शिलकर, तबलावादनासाठी द्वितीय पारितोषिक पटकावलेले मिलिंद परब या कलाकारांसह वेषभूषेसाठी प्रथम पारितोषिक पटकावलेल्या प्रेरणा देसाई, श्रृती बोरकर, पृथा गावकर व अन्य कलाकारांचा डॉ. अजय वैद्य व मुकेश थळी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. डॉ. अजय वैद्य व मुकेश थळी यांनी नाटय़ाभिनयाबरोबरच तंत्राविषयी कलाकारांना मार्गदर्शन केले.