प्रतिनिधी/ बेंगळूर
अमली पदार्थ प्रकरणी कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिला अटक केल्यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणासंबंधी केंद्रीय गुन्हे विभागाच्या (सीसीबी) पोलिसांनी विविध आरोपाखाली एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दिवंगत माजी मंत्री जीवराज यांचा पुत्र आदित्य अल्वा आणि ड्रग्ज पुरवठेदार मुळचा दक्षिण आफ्रिकेतील लूम पेप्पर सांबा यांचाही समावेश आहे.
कोरोना संकटकाळात अडचणीत असलेल्यांना चहा, अल्पोपहार, जेवण वितरण करून समाजसेवेचा मुखवटा परिधान केलेल्या अभिनेत्री रागिणीचा खरा चेहरा आता समोर येत आहे. जुलै 6 रोजी यलहंकानजीकच्या लि रोमा गार्डेनिया रिसॉर्टमध्ये आयोजित पार्टीमध्ये रागिणीचा माजी प्रियकर शिवप्रसाद, मित्र रविशंकर, प्रमुख आरोपी विरेंद्र खन्ना यांच्यासह 15 ते 20 प्रतिष्ठितांचा सहभाग होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना संकटकाळात सभा-समारंभ आयोजित करण्यासाठी असणारे नियम धुडकावून पार्टीचे आयोजन केल्याची चौकशीतून उपलब्ध झाली आहे.
या प्रकरणी बेंगळूरच्या कॉटनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 6 जुलै रोजी आयोजिलेल्या पार्टीसाठी लि रोमा गार्डेनिया रिसॉर्टला एका रात्रीसाठी 4 लाख रुपये भाडे देण्यात आले होते. आयोजकांच्या नियोजन यशस्वी झाले असते तर आजही (शनिवार दि. 5 सप्टेंबर) पार्टी पार पडली असती. सदर पार्टी मुळचा दिल्लीतील विरेन खन्ना याने आयोजिल्या होत्या. अनेक अभिनेते-अभिनेत्री, उद्योजक व इतर प्रतिष्ठित व्यक्तींना पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते, अशी माहिती अटकेतील प्रमुख आरोपी विरेन खन्ना याने चौकशीवेळी दिली आहे.
ड्रग्ज सेवन केल्याची रागिणीची कबुली
आपण दोन वेळा एमडीएमए ड्रग्ज सेवन केल्याची कबुली अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिने दिली आहे. शनिवारी सीसीबी अधिकाऱयांनी केलेल्या चौकशीवेळी रागिणीने आपल्याला मित्र रविशंकर याने ड्रग्ज आणून दिले होते. ते आपण घरामध्येच सेवन केले होते, असे तिने सांगितले आहे. तिने दिलेल्या माहितीवरून 12 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील माफियांशी सॅन्डलवूडचे कनेक्शन?
अभिनेत्री रागिणीचा मित्र रविशंकर आणि अभिनेत्री संजना गल्रानी हिचा प्रियकर राहुल यांच्यासह अनेक जणांना लूम पेप्पर सांबा हा ड्रग्ज पुरवठा करीत होता. तो मुळचा दक्षिण आफ्रिकेतील असून त्याला देखील अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो या प्रकरणातील सातवा आरोपी आहे. त्यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांचे दक्षिण आफ्रिकेतील ड्रग्ज माफियांशी कनेक्शन असावे?, असा संशय व्यक्त होत आहे.
कोणती शिक्षा होऊ शकते?
अमली पदार्थांचे स्मॉल क्वालिटी, मिडल क्वालिटी आणि कमर्शिअल क्वालिटी या तीन विभागात वर्गिकरण केले जाते. अमली पदार्थ पुरवठेदाराविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल झालेल गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला किमान 10 ते कमाल 20 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. तर ग्राहकाला किमान 3 वर्षे आणि कमाल 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच स्मॉल क्वालिटीअंतर्गत गुन्हा दाखल होऊन आरोप सिद्ध झाल्यास 1 ते 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.