मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा : गुंतवणूक परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात गुंतवणूक करून उद्योग उभारण्यासाठी सध्याची वेळ योग्य असून अनेक उद्योग गोव्याकडे वळत आहेत. आझादी का अमृतमहोत्सवी वर्षात 75 उद्योग गोवा राज्यात आणण्याचे लक्ष गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सला देण्यात आले असून ते ध्येय पूर्ण होण्याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्तवली आहे.
गोवा गुंतवणूक 2022 या परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. सावंत बोलत होते. ताळगांव कम्युनिटी हॉलमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
शिक्षण, आयटीतही मोठा वाव
शिक्षण, आयटी तसेच माहिती या क्षेत्रातही गोव्यात गुंतवणुकीला मोठा वाव असून त्यातून गोव्यासाठी मोठय़ा प्रमाणत नोकरीच्या संधी प्राप्त होतील, अशी आशा डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.
खासगी नोकरीकडे दुर्लक्ष नको
गोव्यातील तरूण नोकरी म्हणताच सरकारी नोकरीचा विचार करतात. परंतु इतर सर्व प्रकारच्या खासगी क्षेत्रात त्यांना चांगली नोकरी मिळू शकते, याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी सरकारी नोकरीसाठी वेळ, वर्षे वाया न घालवता खासगी नोकरीची संधी दवडू नये. म्हणून खासगी उद्योगावर भर देऊन नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न जारी आहेत, असेही डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
स्वयंपूर्ण गोवाचे स्वप्न
गोवा हे देशातील प्रमुख शैक्षणिक ‘हब’ करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्यासाठी योग्य मार्गाने पावले टाकण्यात येत असून आयटी क्षेत्रातही गोव्याला पुढे न्यायचे आहे. गोवा राज्याला सर्वच क्षेत्रात स्वावलंबी करणे हा मुख्य हेतू असून त्यातूनच स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न सरकार करायचे आहे असे डॉ. सावंत म्हणाले.
उद्योजक बनून स्वयंपूर्ण व्हावे
सॉफ्टवेअर उद्योगांना देखील गोव्यात निमंत्रित करायचे असून राज्यातील बेकार युवक, युवतींना नोकऱया उपलब्ध करणे यावर सरकारचा भर आहे. सर्वांना सरकारी नोकरी देणे शक्य नाही म्हणून खासगी नोकरीकडे वळावे किंवा स्वयंपूर्ण होऊन उद्योजक बनावे असा सल्ला डॉ. सावंत यांनी दिला.
गोव्यासह देशातील अनेक उद्योजक ‘गोवा गुंतवणूक – 2022’ परिषदेस उपस्थित होते. या परिषदेमुळे गोव्यातील गुंतवणूक तसेच उद्योग वाढण्यास मदत होणार असल्याची ग्वाही परिषदेतून देण्यात आली.