ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात जवळपास 97 हजार लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती अमेरिकेतील बाल रोग अकॅडमी आणि चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशन कडून जारी करण्यात आलेल्या राज्यस्तरीय डाटाच्या नवीन समीक्षा रिपोर्टमध्ये देण्यात आली. ही वाढलेली संख्या देशातील लहान मुलांच्या एकूण कोरोना बाधितांमध्ये 40 टक्के वाढ झाल्याचे दर्शवत आहे.
अमेरिका देशातील शाळा सुरक्षितरित्या सुरू करण्याच्या विचारात असतानाच हा रिपोर्ट समोर आला आहे. विशेषज्ञांच्या मते, हा रिपोर्ट असे सांगतो की, लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते आणि याचा संसर्ग दुसऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. तसेच लहान मुलांची प्रतिकार शक्ती कोरोनाला रोखण्यासाठी असमर्थ आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. इथे आतापर्यंत जवळपास 3 लाख 40 हजार लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही संख्या देशातील कोरोना बाधितांच्या संख्येच्या 9 टक्के आहे. लहान मुलांमध्ये कोरोना वाढण्याचे प्रमाण दक्षिण आणि पश्चिम भागातील राज्यांमध्ये अधिक आहे. यामध्ये मिसौरी, ओक्लाहोमा, जॉर्जिया, फ्लोरिटा, मौंटाना आणि अलास्का यांचा समावेश आहे.
दरम्यान, हल्लीच जॉर्जिया मधील शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, शाळा सुरू केल्यानंतर एकाच आठवड्यात 250 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शाळा सुरू करण्याबाबत आग्रही असून ज्या शाळा सुरू केल्या जाणार नाहीत, त्यांची आर्थिक मदत बंद करण्यात येईल, असे विधान त्यांनी जुलै महिन्यात केले होते.