वॉशिंग्टनचाही समावेश : कृष्णवर्णीयाच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण : शहरांमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूच्या विरोधात अमेरिकेत सुरू असलेले आंदोलन हिंसक झाले आहे. राजधानी वॉशिंग्टन डीसी समवेत 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून रविवारी रात्री आंदोलकांनी व्हाइट हाउससमोर धाव घेतल्याने सुरक्षा दलांना अश्रूधूराचा वापर करावा लागला. व्हाइट हाउससमोरील आंदोलनादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुक्रवारी काही वेळासाठी भूमिगत बंकरमध्ये जावे लागले होते.
वॉशिंग्टन समवेत 15 शहरांमध्ये सुमारे 5 हजार नॅशनल गार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. संकट अधिक गडद होण्याची भीती पाहता 2 हजार गार्ड्सना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
मिनेपोलिसमध्ये 26 मे रोजी फ्लॉयडला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती. तत्पूर्वी एका पोलीस अधिकाऱयाने फ्लॉयडला रस्त्यावर पायाचा वापर करत 8 मिनिटांपर्यंत दाबून ठेवले होते. फ्लॉयडला बेडय़ा ठोकण्यात आल्या होत्या. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. चित्रफितीत 46 वर्षीय जॉर्ज पोलीस अधिकाऱयाला गुडघा हटविण्याची विनंती करताना दिसून येतो. ‘तुमचा गुडघा माझ्या मानेवर असल्याने मला श्वास घेण्यास त्रास होतोय’ असे जॉर्ज म्हणत असल्याचे आढळून येते. अधिकाऱयाने त्याला ‘उठ आणि कारमध्ये बस’ असे सांगूनही त्याच्याकडून कुठलाच प्रतिसाद येत नाही. यादरम्यान गर्दी जमा झाल्याने जॉर्जला रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाला होता.
200 वर्षे जुन्या चर्चला लावली आग
पोलिसांच्या हातून जॉर्ज फ्लॉयड मारला गेल्यावर अमेरिकेत हिंसाचाराचे लोण पसरले आहे. 50 पैकी 40 प्रांतांमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृत फ्लॉयडच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे. आंदोलक व्हाइट हाउसपर्यंत पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे. रविवारी रात्री उशिरा आंदोलकांनी व्हाइट हाउसपासून काही मीटर अंतरावर असलेल्या 200 वर्षे जुन्या सेंट जॉन चर्चला आगीच्या हवाली केले आहे. 1816 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या चर्चला ‘चर्च ऑफ प्रेसिडेंट्स’ म्हटले जाते. व्हाइट हाउसमध्ये राहणारा प्रत्येक अध्यक्ष या चर्चला भेट देत असतो.