बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित बेळगाव प्रिमियर लीग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जुनवीर श्री साई सोशलने मोहन मोरे संघाचा 5 गडय़ांनी, साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने विश्रुत स्ट्रायकर्स संघाचा 5 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अर्जुन पाटील (अर्जुनवीर), डॉमनिक फर्नांडिस (साई स्पोर्ट्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मोहन मोरे संघाने 20 षटकात 8 बाद 117 धावा केल्या. धुव नाईकने 1 षटकार, 6 चौकारासह 51, रूद्रगौडा पाटीलने 1 षटकार 5 चौकारासह 26, रवी पिल्लेने 12 धावा केल्या. अर्जुनवीरतर्फे अर्जुन पाटीलने 9 धावात 3 तर राहुल वाजंत्री, विजय पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुनवीर श्री साई सोशल संघाने 13.5 षटकात 5 बाद 119 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. अमेय भातकांडेने 1 षटकार 3 चौकारासह 25, विजय पाटीलने 1 षटकार 2 चौकारासह 23, केदार उसुलकरने 1 षटकार 1 चौकारासह 24 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे आनंद कुंभारने 28 धावात 2, जोतिबा गिलबिले, दर्शन मयेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात विश्रुत स्ट्रायकर्स संघाने 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या. अंगदराज हित्तलमनीने 5 चौकारासह 48 तर दत्तप्रसाद जांभवलेकरने 1 षटकार 2 चौकारासह 30, रोशन जवळीने 2 षटकार 2 चौकारासह 23, रब्बानी दफेदारने 1 षटकार 1 चौकारासह 18 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे भरत गाडेकरने 28 धावात 2, डॉमनिक फर्नांडिस व किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्सने 19.3 षटकात 5 बाद 169 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. त्यात स्वप्निल एळवेने 1 षटकार 5 चौकारासह 51, डॉमनिक फर्नांडिसने 2 षटकार 4 चौकारासह 43, राजेंद्र दंगण्णावरने 3 षटकार 3 चौकारासह 45 धावा केल्या. विश्रुततर्फे राहुल नाईकने 14 धावात 2, अंगदराज हित्तलमनीने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अशोक पाटील, सदानंद चौगुले, शिवाजीराव नेसरीकर, चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते सामनावीर अर्जुन पाटील, इम्पॅक्ट खेळाडू ध्रुव नाईक, सर्वाधिक षटकार सुजय सातेरी, उत्कृष्ट झेल रवी पिल्ले यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे चंद्रकांत बांडगी, रवी कणबर्गी, प्रमोद जपे आदी मान्यवरांच्या हस्ते सामनावीर डॉमनिक फर्नांडिस, इम्पॅक्ट खेळाडू व सर्वाधिक षटकार राजेंद्र दंगण्णावर, उत्कृष्ट झेल आकाश असलकर यांना चषक देवून गौरविण्यात आले.