स्मार्ट सिटी अंतर्गत सहा महिन्यांपूर्वी खोदाई : रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या सहा महिन्यांपासून कूर्मगतीने सुरू असलेल्या विकासकामांमुळे बेळगाव शहरातील जुना धारवाड रोड, हिंद इंजिनिअरिंग जवळ समस्या निर्माण झाली आहे. येथील रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने मोठमोठी वाहने अडकण्याचे प्रकार वारंवार घडत असून वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. त्यातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत गेल्या सहा महिन्यांपूर्वी येथील रस्त्याचे काम करण्यासाठी खोदाई करण्यात आली. मात्र सहा महिने उलटून गेले तरी येथील परिस्थिती जैसे थेच आहे. पण रस्ताकामासाठी लागणारे साहित्य अर्थात खडी, डेनेजची पाईप रस्त्यावर ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना या मार्गावरून ये-जा करणे कठीण बनले आहे. तसेच खोदाई करण्यात आल्यामुळे रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरले आहे.
अवजड वाहनांची नेहमी वर्दळ
जुना पी. बी. रोड ते शिवाजी उद्यानला जोडणारा भातकांडे हायस्कूल जवळील रस्ता हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. मात्र येथील रस्ता ओबडधोबड झाल्याने अवजड वाहने एकाच जागी अडकून बसत आहेत. परिणामी वाहनधारकांना तासनतास एकाच जागेवर थांबावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही समस्या जैसे थे असल्याने येथील नागरिकांची आणि व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे येथील रस्त्याचे काम लवकर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.