शहापूर येथील पी. के. क्वॉर्टर्सजवळील समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा कायापालट करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी अर्धवट विकासकामे राबविल्याने नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे. शहापूर येथील पी. के. क्वॉर्टर्स शेजारी नव्याने गटारीचे काम करण्यात आले आहे. मात्र, सदर काम अर्धवट अवस्थेत असलेल्याचे निदर्शनास येत असून गटारी बुजल्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
येथील गटारीच्या पाईपमध्ये माती शिरल्याने पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी सर्व पाणी रस्त्याच्या बाजूला साचून दलदल निर्माण झाली आहे. यामुळे डासांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना वेगवेगळय़ा आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून येथील काम अर्धवट असून ते पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या भागातील नागरिकांच्या घरातील सांडपाणी जाण्यास जागा नसल्याने समस्या उद्भवली असून सदर काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.