ग्रामस्थांचे वनाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
अलतगा येथील प्राथमिक मराठी शाळेसमोर काही झाडे आहेत. ती झाडे हटवावीत आणि येथील विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरण निर्माण करुन द्यावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हा पंचायतच्या सदस्या सरस्वती पाटील व गाव सुधारणा समितीचे अध्यक्ष आर. आय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखली वनाधिकाऱयांना देण्यात आले.
शाळा आवारात झाडे असल्यामुळे या ठिकाणी माकडांचा उपद्रव वाढला आहे. या ठिकाणी माकडांमुळे शाळेची कौले फुटून विद्यार्थ्यांना पावसामध्ये पाण्यातच बसावे लागत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अस्वच्छ वातावरणात रहावे लागत असल्याने या ठिकाणची असलेली झाडे हटवावीत, अशी मागणीही यावेळी निवेदनाव्दारे करण्यात आली.
रुर्बन योजनेंतर्गत या ठिकाणी स्मार्ट खोलीसाठी अनुदान मंजूर झाले आहे. दरम्यान शाळेचे मैदान लहान असून त्या ठिकाणी हा वर्ग बांधणे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे संबंधीत झाडे हटविल्यास सोयीचे ठरणार आहे. सध्या या वर्गखोलीसाठी 5 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र जर ही झाडे हटविली नाहीत तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे ही झाडे हटवावीत, अशी मागणी करण्यात आली. वनाधिकारी शिवानंद मगदूम यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यांनी यावेळी हे काम तातडीने करुन देवू, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, गाव सुधारणा समितीचे आय. आय. पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष चंदु धुडूम, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष बाळू हिरोजी, सदस्य दुर्गाराम पाटील, मनोहर आलोजी, बाळु चौगुले, पिंटू जाधव, मनू आलोजी, बाळू पाटील यांच्यासह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.