एकाच कुटुंबातील तिघा जणांना अटक, एपीएमसी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बॉक्साईट रोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून एकाच कुटुंबातील तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश असून एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
23 ऑक्टोबर 2020 रोजी एका दहा वषीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. 31 डिसेंबर रोजी अपहरण झालेली मुलगी बेळगावात परतली असून एपीएमसी पोलिसांनी तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.
या प्रकरणी शुभम पावले (वय 20), त्याचा भाऊ सतीश (वय 21), बहीण चंद्रिका (वय 26) सर्व राहणार होनगा यांना अटक करण्यात आली आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाला मदत केल्याच्या आरोपावरून शुभमचा भाऊ व बहिणीलाही अटक झाली आहे.