गजर टाळ-मृदुंगाचा कार्यक्रमाने भाविक झाले तृप्त

प्रतिनिधी /बेळगाव
अवघे गर्जे कपिलेश्वर
चालला विठू नामाचा गजर….
याचे प्रत्यंतर देत दक्षिण काशी समजल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिर तलावाच्या प्रांगणामध्ये टाळ-मृदुंगाचा गजर दुमदुमत राहिला. अभंगात तल्लीन झालेले वारकरी आणि त्यांना तितक्मयाच उत्स्फूर्ततेने साथ देणारे भाविक, तलावाच्या चोहोबाजुनी फडकत राहिलेले भगवे ध्वज आणि या सर्वांचे आकर्षक ठरलेली विठुरायाची भव्य मूर्ती, यामुळे बेळगावमध्ये शुक्रवारी प्रतिपंढरपूरच अवतरल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण झाली.

दक्षिण काशी समजल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिर विश्वस्त समितीतर्फे शुक्रवारी ‘गजर टाळ-मृदुंगाचा’ हा कार्यक्रम झाला आणि बऱयाच दिवसांनी भक्तिमय कार्यक्रमाचा आस्वाद बेळगावकरांना घेता आला. या कार्यक्रमात बेळगाव आणि ग्रामीण भागातील 800 हून अधिक वारकऱयांनी अभंग सादर केले. त्यांच्या तल्लीनतेला उपस्थितांचीही तितकीच दाद मिळाली.
कपिलेश्वर मंदिरात विश्वस्त समिती सदस्यांच्या हस्ते विठ्ठलाची व ज्ञानेश्वरांची आरती म्हणण्यात आली. टाळ, चिपळय़ांच्या नादात कार्यक्रमस्थळी पालखी आणण्यात आली. यावेळी वज्रनाथ ढोल-ताशा पथकाने त्यांना साथ दिली. येथे मंदिर समितीचे अध्यक्ष राजू बाळेकुंद्री यांनी टाळ-मृदुंगाचे पूजन केले. उपाध्यक्ष सतीश निलजकर यांनी वीणा पूजन केले. विनायक लोकूर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर पूजन, राजू भातकांडे यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन, राहुल कुरणे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथेचे पूजन तर चिराग भातकांडे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर सुनील बाळेकुंद्री, सतीश निलजकर, राकेश कलघटगी, अविनाश खन्नुकर, विवेक पाटील, राहुल कुरणे, अभय लगाडे, प्रसाद बाचुळकर, अनिल मुतकेकर, दौलत जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सेवेकरी नागराज कत्ती व आनंदाचे यांनी शंखनाद केला. अभिजित चव्हाण यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले. अभंग कार्यक्रमाचे संचलन मारुती महाराज यांनी केले.
सर्वप्रथम मृदंगाचार्य मयूर महाराज सुतार यांनी व त्यांच्या शिष्यांनी मृदंग वादन केले. त्यानंतर विविध वारकरी संघाच्या वारकऱयांनी सादर केलेल्या विठ्ठल भक्तीच्या अभंगाने वातावरण भारुन गेले. कपिलेश्वर तलावाच्या प्रांगणामध्ये विठ्ठल भक्तांची एकच गर्दी झाली. शिवाय कपिलेश्वर पुलावरून सुद्धा अनेक भाविकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. हा संपूर्ण कार्यक्रम नेटक्मया पद्धतीने पार पडण्यासाठी मंदिर समितीचे विश्वस्त व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
आजच्या काळात तरुणाई केवळ डीजेच्या तालावर थिरकते आहे. बरीचशी तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे. अशावेळी भावी पिढीला मार्गदर्शन करण्याची आणि पारमार्थिक आनंद म्हणजे काय? हे समजून देण्याची नितांत गरज आहे. मानव जातीचे कल्याण हेच वारकरी संप्रदायाचे सूत्र आहे. त्यामुळे ‘गजर टाळ-मृदुंगाचा’ हा कार्यक्रम घेतल्याचे अभिजित चव्हाण व मारुती महाराज यांनी स्पष्ट केले.
नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी या भावनेने झालेल्या या कार्यक्रमाने बेळगावकर तृप्त झाले.