यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांमध्येच खुर्दा, अश्विनचे 55 धावात 4 बळी
ऍडलेड / वृत्तसंस्था
अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या विदेशातील सर्वोत्तम गोलंदाजीच्या बळावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांमध्येच गारद करण्याचे घसघशीत यश प्राप्त केले. ऍडलेड ओव्हलवरील या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाची अश्विन-यादवसमोर चांगलीच दाणादाण उडाली अणि त्यांचा डाव पाहता पाहता गडगडला. शुक्रवारी या सामन्याच्या दुसऱया दिवसअखेर भारताने 1 बाद 9 अशी खराब सुरुवात केली.
वास्तविक, भारताला पहिल्या डावात सर्वबाद 244 अशा साधारण धावसंख्येवर समाधान मानावे लागले होते. पण, अश्विनच्या (18-3-55-4) भेदक माऱयासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव त्यापेक्षा अधिक गडगडला आणि पहिल्या डावाअखेर भारताने 53 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने (99 चेंडूत 73) एकाकी लढत दिली. उमेश यादवने अश्विनला उत्तम साथ देताना 40 धावात 3 फलंदाज बाद केले.

त्यानंतर दुसऱया डावात भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला आणि दुसऱया दिवसअखेर भारताची 1 बाद 9 अशी स्थिती राहिली.
तीन महत्त्वाचे टप्पे
शुक्रवारी भारतीय गोलंदाजीचे तीन टप्पे महत्त्वाचे ठरले. पहिल्या टप्प्यात बुमराहने (21-7-52-2) फुल्लर लेंग्थ मारा करत कांगारुंना वेसण घातली. दुसऱया टप्प्यात अश्विनने अतिशय बिनचूक टप्प्यावर त्यांना जखडून ठेवले आणि तिसऱया टप्प्यात उमेश यादवने (16.1-5-40-3) जुन्या कुकाबुरा चेंडूवर धोकादायक लाबुशाने व कमिन्सला तंबूचा रस्ता दाखवला.
मोहम्मद शमीने (17-4-41-0) देखील बिनचूक मारा केला. पण, सहकाऱयांच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे विकेटच्या निकषावर त्याची पाटी कोरी राहिली. भारताने अगदी 4 झेल सांडले. पण, यानंतरही भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 72.1 षटकातच गुंडाळल्याने ती जीवदाने फारशी महागडी ठरली नाहीत. 3 जीवदाने लाभलेला लाबुशाने (119 चेंडूत 47) फारसा लाभ घेऊ शकला नाही तर टीम पेनला अन्य कोणाकडून अपेक्षित साथ लाभली नाही.
पहिल्या सत्रात बुमराहने दोन्ही सलामीवीरांचा अडसर दूर केल्यानंतर अश्विनने दुसऱया सत्रात मधल्या फळीला सुरुंग लावला. त्याने स्मिथला टाकलेला फ्लायटेड चेंडू सर्वोत्तम ठरला. अजिंक्य रहाणेने पहिल्या स्लीपमध्ये स्मिथचा झेल टिपला. ट्रव्हिस हेड (7) अश्विनकडे परतीचा झेल देत परतला तर पदार्पणवीर कॅमेरुन ग्रीनचा (11) विराट कोहलीने मिडविकेटवर घेतलेला झेल अव्वल दर्जाचा ठरला. विराटने यावेळी पूर्णपणे उजवीकडे झेपावत हा झेल पूर्ण केला होता.
दिवसभरातील शेवटच्या टप्प्यात भारताने 6 षटकात 1 बाद 9 धावा केल्या. पृथ्वी शॉ 4 धावांवर त्रिफळाचीत झाला तर सहकारी सलामीवीर मयांक अगरवाल (21 चेंडूत 5), नाईट वॉचमन बुमराह (11 चेंडूत 0) नाबाद राहिले.
धावफलक
भारत पहिला डाव (6 बाद 233 वरुन पुढे) : रविचंद्रन अश्विन झे. पेन, गो. कमिन्स 15 (20 चेंडूत 1 चौकार), वृद्धिमान साहा झे. पेन, गो. स्टार्क 9 (26 चेंडूत 1 चौकार), उमेश यादव झे. वेड, गो. स्टार्क 6 (13 चेंडूत 1 चौकार), जसप्रित बुमराह नाबाद 4 (7 चेंडूत 1 चौकार), शमी झे. हेड, गो. कमिन्स 0 (1 चेंडू). अवांतर 18. एकूण 93.1 षटकात सर्वबाद 244.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (शॉ, 0.2), 2-32 (मयांक, 18.1), 3-100 (पुजारा, 49.4), 4-188 (विराट, 76.6), 5-196 (रहाणे, 80.4), 6-206 (विहारी, 83.2), 7-233 (अश्विन, 89.3), 8-235 (साहा, 90.3), 9-240 (उमेश यादव, 92.2), 10-244 (शमी, 93.1).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 21-5-53-4, हॅझलवूड 20-6-47-1, कमिन्स 21.1-7-48-3, कॅमेरुन ग्रीन 9-2-15-0, लियॉन 21-2-68-1, लाबुशाने 1-0-3-0.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : मॅथ्यू वेड पायचीत गो. बुमराह 8 (51 चेंडूत 1 चौकार), जो बर्न्स पायचीत गो. बुमराह 8 (41 चेंडू), मार्नस लाबुशाने पायचीत गो. यादव 47 (119 चेंडूत 7 चौकार), स्टीव्ह स्मिथ झे. रहाणे, गो. अश्विन 1 (29 चेंडू), ट्रव्हिस हेड झे. व गो. अश्विन 7 (20 चेंडू), कॅमेरुन ग्रीन झे. कोहली, गो. अश्विन 11 (24 चेंडूत 1 चौकार), टीम पेन नाबाद 73 (99 चेंडूत 10 चौकार), पॅट कमिन्स झे. रहाणे, गो. यादव 0 (3 चेंडू), मिशेल स्टार्क धावचीत (शॉ-साहा) 15 (16 चेंडूत 1 चौकार), नॅथन लियॉन झे. कोहली, गो. अश्विन 10 (21 चेंडूत 1 चौकार), हॅझलवूड झे. पुजारा, गो. यादव 8 (10 चेंडूत 2 चौकार). अवांतर 3. एकूण 72.1 षटकात सर्वबाद 191.
गडी बाद होण्याचा क्रम
1-16 (मॅथ्यू वेड, 14.1), 2-29 (बर्न्स, 16.6), 3-45 (स्मिथ, 26.6), 4-65 (हेड, 34.4), 5-79 (ग्रीन, 40.3), 6-111 (लाबुशाने, 53.3), 7-111 (कमिन्स, 53.6), 8-139 (स्टार्क, 60.1), 9-167 (लियॉन, 66.5), 10-191 (हॅझलवूड, 72.1).
गोलंदाजी
उमेश यादव 16.1-5-40-3, जसप्रित बुमराह 21-7-52-2, शमी 17-4-41-0, रविचंद्रन अश्विन 18-3-55-4.
भारत दुसरा डाव : पृथ्वी शॉ त्रि. गो. कमिन्स 4 (4 चेंडू), मयांक अगरवाल नाबाद 5 (21 चेंडू), जसप्रित बुमराह नाबाद 0 (11 चेंडू). एकूण 6 षटकात 1 बाद 9.
गडी बाद होण्याचा क्रम
1-7 (शॉ, 3.1).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 3-1-3-0, पॅट कमिन्स 3-2-6-1.