अहमदनगर / प्रतिनिधी
एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीलाच (ST) गळपास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) घडली आहे. दिलीप हरिभाऊ काकडे (Dilip Kakade) असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. शेवगाव एसटी आगारात ते चालक म्हणून कार्यरत होते.
चालक दिलीप हरिभाऊ काकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात ते सहभागी झाले होते. परीवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानर संप मागे घेतल्याची घोषणासुद्धा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. पण चालक हरिभाऊ काकडे यांनी डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली. या घटनेची माहिती मिळताच आगारातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. तर पोलीस देखील घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत चालक काकडे यांचा मृत्यू झाला होता.
या आत्महत्ये मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पगार नसल्याने कर्जबाजारीपणामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.आतापर्यंत 19 महिन्यात २६ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.