आंगणे कुटुंबियांना यात्रेत प्रवेशासाठी ओळखपत्र : यात्रेचे नियोजन जाहीर : राजकीय नेतेमंडळींनाही प्रतिबंध
जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय
आंगणे कुटुंबातील पन्नास व्यक्तींनाच एकावेळी प्रवेश
अन्य भाविकांना आंगणेवाडीत प्रवेश मिळणार नाही
मंदिर परिसरात एकही दुकान असणार नाही
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱया मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील 50 व्यक्तींनाच एकावेळी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अन्य भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे मार्ग पोलिसांतर्फे सील केले जाणार आहेत. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात एकही दुकान अथवा विक्रेता असणार नाही, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
प्रथेप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी आंगणे कुटुंबियांनी भराडी देवीच्या यात्रेची 6 मार्च ही तारीख जाहीर केली. मात्र, कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा केवळ आंगणे कुटुंबियांच्या उपस्थितीत होऊन मंदिरातील धार्मिक विधी होतील. भाविकांना यात्रेत प्रवेश नसल्याचे आंगणे कुटुंबीय व प्रशासनानेही जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर यात्रेत आंगणे कुटुंबियांचीही एकाचवेळी गर्दी होऊ नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन व आंगणे कुटुंबियांची यात्रा नियोजन बैठक आंगणेवाडी येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
बैठकीनंतर जिल्हाधिकाऱयांनी मंदिर परिसराची पाहणी करत सूचना केल्या. प्रांताधिकारी वंदना खरमाळे, आंगणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सभापती अजिंक्य पाताडे, मालवण पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, काका आंगणे, बाळा आंगणे, नंदू आंगणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे अभियंता नितीन दाणे, अनंत आंगणे, बाबू आंगणे, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी, बिळवस सरपंच पालव आदी उपस्थित होते.
चर्चेतून यात्रेदिवशी पहाटे चार वाजल्यापासून दर्शनास येणाऱया आंगणे कुटुंबियांची मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरोनाविषयक तपासणी आरोग्य विभाग व आंगणेवाडी मंडळातर्फे करण्यात येईल. तापमान व ऑक्सिजन तपासणीनंतरच मंदिरात प्रवेश देण्यात येईल. एकावेळी मंदिर व मंडप परिसरात 50 पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची काळजी प्राधान्याने घ्यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱयांनी प्रशासन व आंगणेवाडी मंडळास दिल्या. मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य पथक तैनात असेल. रुग्णवाहिकाही उपलब्ध असेल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी यांनी सांगितले. दर्शनासाठी येणाऱया आंगणे कुटुंबियांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. आंगणे कुटुंबीय, आंगणे कुटुंबातील सुना, लग्न झालेल्या मुली व त्यांचे कुटुंबिय यांनाच यात्रा कालावधीत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी सांगितले.
मंदिराकडे येणाऱया मालवण, मसुरे व कणकवली अशा तिन्ही मार्गावर बॅरिकेड्स लावून पोलीस प्रशासन मार्ग सील करणार आहे. या तिन्ही मार्गावरून कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. आंगणे कुटुंबियांचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही, अशा सक्त सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
मंदिरापासून एक किमी अंतरावर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात येईल. मंदिर परिसरात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. यात्रेच्या दुसऱया दिवशी, 7 मार्च रोजी दुपारपर्यंतच पोलीस बंदोबस्त व आरोग्य कर्मचारी तैनात राहणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात्रेनिमित्त 5 ते 7 मार्च रोजी आंगणेवाडी येथून होणारी एसटी व इतर वाहतूक अन्य मार्गाद्वारे वळविण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी खरमाळे यांनी सांगितले.
मंदिर परिसरात दुकान, स्टॉल नको
दरवर्षी आंगणेवाडी यात्रेत विविध ठिकाणांहून आलेले फिरते, स्थानिक व्यापारी खाद्य पदार्थांचे, वस्तू, खेळणी, कपडय़ांचे स्टॉल मंदिर परिसरात उभारतात. मात्र यावर्षी मंदिर परिसरात एकही दुकान अथवा स्टॉल उभारता येणार नाही. मंदिर परिसरात आधीपासूनच स्थानिकांची जी कायमस्वरुपी हॉटेल्स, दुकाने व स्टॉल आहेत, तेही जत्रेदिवशी बंद राहतील, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत.
नेतेमंडळी, पत्रकारांनाही प्रवेश नाही!
आंगणेवाडी यात्रेत राजकीय नेतेमंडळी अथवा पत्रकारांनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. 6 मार्च रोजी आंगणेवाडी यात्रेदरम्यान मसुरे-देऊळवाडा-आंगणेवाडी या साठवण तलावाचे ऑनलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती यावेळी प्रशासनाने दिली.