खासदार विनायक राऊत यांची माहिती
प्रतिनिधी / देवगड:
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हापुस आंब्याला मुंबईसह मोठय़ा शहरांमध्ये मोठी मागणी आहे. मात्र, आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याने आंबा वाहतुकीसाठी 23 एप्रिल रोजी स्पेशल ट्रेन कोकण-मुंबई मार्गावर सोडण्यात येणार आहे. तसेच आंबा बागायतदारांची मागणी वाढल्यास आणखी ट्रेन सोडण्यात येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील आरोग्य, प्रशासन व पोलीस यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे कोरोना जिल्हय़ापासून दूर आहे. आम्ही कोणीही लोकप्रतिनिधी त्यांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी देवगड येथील दौऱयात दिली.
खासदार राऊत यांनी मंगळवारी देवगड तालुक्याला भेट देऊन तहसीलदार मारुती कांबळे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱयांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, राष्ट्रवादीचे नंदकुमार घाटे, सभापती सुनील पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शहरप्रमुख संतोष तारी आदी उपस्थित होते.
अजून भीती संपलेली नाही!
खासदार राऊत म्हणाले, जिल्हय़ात सद्यस्थितीत एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही. मात्र, आयसोलेशनमध्ये सुमारे 60 रुग्ण आहेत. तर होम क्वारंटाईन सुमारे 500 जण आहेत. आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या जरी 60 असली तरी आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. अजून भीती संपलेली नाही. जिल्हा आरोग्य यंत्रणा यासाठी दिवसरात्र त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यामुळे जिल्हा सुरक्षित आहे. जे 60 रुग्ण आयसोलेशनमध्ये आहेत ते आपलेच लोक बाहेरून जिल्हय़ात आलेले आहेत. त्यामध्ये स्थानिक कोणीही नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी राऊत यांनी तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडून धान्य वितरणाबाबत माहिती घेतली. तसेच देवगड शहरामध्ये शिवभोजन थाळी सुरू करण्यासाठी तहसीलदारांना उपविभागीय अधिकाऱयांकडे पत्र पाठवायला सांगितले. शिवभोजन थाळी सुरू करण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकाऱयांना दिले आहेत. देशात प्रथमच महाराष्ट्र सरकारने केसरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हय़ांतर्गत वाहतूक सेवा व जिल्हा बाहय़ वाहतूक सेवेबाबत 3 मे नंतरच निर्णय घेतले जाणार आहेत. आपल्या जिल्हय़ातील जे लोक मुंबई व अन्य शहरांमध्ये अडकलेले आहेत त्यांना देखील आणण्यासाठी 3 मेनंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार कांबळे यांच्यासह न. पं. मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष केंडके, बांधकाम उपअभियंता श्री. निकम, देवगड सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, विजयदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी आदी उपस्थित होते.
चाकरमान्यांबाबत सहानुभूती!
चाकरमान्यांबाबत आपल्याला सहानुभूती आहे. चाकरमान्यांना मे महिन्यामध्ये गावी येणाची घाई आहे. मात्र, सध्या जगावर आलेले कोरोनाचे संकट व मुंबईमध्ये असलेले काही भाग हे रेडझोनमध्ये असल्यामुळे तूर्त तरी चाकरमान्यांनी गावाकडे येण्याची घाई करू नये. शिवभोजन थाळीवर टीका करून कमळ थाळी सुरू करणाऱयांना आमच्या शुभेच्छा देत म्हणाले आपल्याला कोणावरही टीका करायची नाही. टीका करण्याची ही वेळ नाही, असेही ते म्हणाले.