पोखरण येथील घटना : कुटुंबातील उर्वरित नऊजणांची कोरोनावर मात
विनोद परब / कसाल:
पोखरण गावातील रहिवासी व जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष विजय गुरव यांच्या कुटुंबातील तिघांचा कोरोनाने आठवडाभरात मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आलेल्या या मोठय़ा कुटुंबातील बाराजणांपैकी नऊजण सुदैवाने कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले.
कुडाळ तालुक्यातील कसाललगत असलेल्या पोखरण गावात ही घटना घडली. सतरा सदस्यीय या कुटुंबातील तब्बल 12 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात छोटय़ा मुलांचाही समावेश होता. पैकी तुकाराम उर्फ दादा गुरव (76), त्यांची पत्नी सौ. सुगंधा (65) यांचा कणकवली रुग्णालयात उपचार घेत असताना लागोपाठच्या दिवसांमध्ये मृत्यू झाला. कुटुंबातील या प्रमुख दोन सदस्यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून गुरव कुटुंबीय सावरते न सावरते तोच या कुटुंबातील आणखी एक युवा सदस्य प्रशांत (27) याचा याच आठवडय़ात कोरोनाने मृत्यू झाला. आठवडाभरातील या तिघांच्या मृत्यूने गुरव कुटुंब हादरून गेले. या कठीण परिस्थितीतही अन्य नऊ पॉझिटिव्ह सदस्य सुदैवाने सुखरुपपणे या आजारावर मात करीत बाहेर आले. अद्याप हे कुटुंब विश्रांतीसाठी घरातच क्वारंटाईन झाले आहे.
मृत्यू झालेले तुकाराम गुरव, त्यांची पत्नी सुगंधा व मुलगा प्रशांत हे नेहमी गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असायचे. त्यांच्या या आकस्मिक निधनाने पोखरण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.