पणजी /प्रतिनिधी
राज्यात गेल्या चोवीस तासात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. सांखळीमध्ये अडीच इंच एवढी पावसाची नोंद झाली. फोंडामध्ये दोन इंच वाळपईमध्ये दीड इंच, मुरगाव व सांगे येथे पाउण इंच, तर काणकोणमध्ये एक सेंटीमीटर एवढी पावसाची नोंद झाली. आगामी चोवीस तासात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे
अंदमानच्या समुद्रात कमी दाबाच्या निर्माण झालेल्या पट्टय़ामुळे गोवा व शेजारील राज्यांमध्ये देखील सध्या जोरदार पाऊस चालू आहे. गोव्यात शनिवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला व सकाळी नऊवाजेपर्यंत अनेक भागात पावसाने झोडपून काढले. मुसळधार पडलेल्या या पावसामुळे राज्यात तयार झालेल्या शेतीचे पीक देखील भिजून गेले आणि त्यामुळे शेतकऱयांचे बरेच नुकसान झाले मान्सून उत्तर पावसामुळे राज्यात बऱयाच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात सर्वत्र विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडेल. येत्या दिनांक 13 व 14 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच वाऱयाचा वेग ताशी 40 वरून 75 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो व त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, असे हवामान खात्याने कळविले आहे.