ऑनलाईन टीम / आग्रा :
आग्रा बाजार पेठेमध्ये सुरू असलेला सम – विषम फॉर्म्युला रद्द करण्यात आला आहे. आता सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत बाजारपेठा सुरू राहतील. तसेच सोमवारची साप्ताहिक सुट्टी बंद करण्यात आली असून त्या ऐवजी दर शनिवार आणि रविवारी आता शहरात पूर्णपणे बंद असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रभू एन सिंह यांनी दिली.
ते म्हणाले, सोमवार म्हणजेच आज पासून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता दर आठवड्यातील शनिवार रविवारी शहरात पूर्णपणे लॉक डाऊन असणार आहे.
या 48 तासात सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मंडई, सरकारी आणि खाजगी ऑफिसेस देखील बंद राहतील. सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाच दिवस रस्त्यावरील दोन्ही बाजूची दुकाने सुरू राहतील. दुकानांची वेळ देखील आठ तासांवरुन नऊ तास करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू राहतील, असेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवीन नियम पुढील प्रमाणे :
– जे बाजार सोमवारी बंद रहायचे, ते सोमवारी सुरू राहतील.
– सर्व दुकानदारांना मास्क घालणे बंधनकारक असेल तसेच ‘दो गज दुरी’ चे पालन करावे लागले.
– ज्या बाजारांमध्ये नियमांचे उल्लंघन केले जाईल, ते बाजार पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवले जातील.
– 48 तासांच्या लॉक डाऊन मध्ये फक्त मेडिकल दुकाने आणि दूध सुविधा सुरू राहील.