गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणूक निकालानंतर राजकीय पक्षांचे लक्ष कर्नाटकावर खिळले आहे. पाच महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर छत्तीसगड, राजस्थान, त्रिपुरा, मध्यप्रदेश या चार राज्यात निवडणुका होणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी या पाचही राज्यांच्या निवडणूक तयारीचा सोमवारी आढावा घेतला आहे.
गुजरातमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केल्याच्या खुशीत भाजप कार्यकर्ते आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. सतत अपयशाला तोंड देणाऱया काँग्रेसला मात्र हिमाचल प्रदेशातील विजयामुळे बुस्टर डोस मिळाला आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्ता मिळवायचीच, या इर्षेने काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न साकार करण्याच्या तयारीत भाजप नेतृत्व आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्ष सत्तेवर आला. गुजरातमध्येही आपने खाते उघडले आहे. त्यामुळे काँग्रेसला पर्याय म्हणून आपची वाटचाल सुरू झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कर्नाटकातही आम आदमी पक्ष जादू दिसून येणार का? कारण, भाजप, काँग्रेस, निजदच्या बरोबरीने आपनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रचाराची कार्यपद्धत, जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अवलंबिलेला परिणामकारक मार्ग आदींमुळे आपची पाळेमुळे जनमानसात रुजू लागली आहेत. दिल्ली महानगरपालिकेवरील गेल्या पंधरा वर्षांची भाजपची सत्ता आपने उलथवली आहे. ‘आप’ला नामोहरम करण्यासाठी वेगवेगळय़ा मार्गाने प्रयत्न झाले. तरीही दिल्ली मनपावर आप सत्तेवर आला. गुजरात, हिमाचल प्रदेश व दिल्ली मनपा निवडणूक निकालांचे दूरगामी परिणाम कर्नाटकातील निवडणूक निकालावरही होणार, अशी अटकळ आहे. कारण वेगवेगळय़ा राजकीय पक्षांनी आजवर केलेल्या सर्वेक्षणात त्रिशंकू विधानसभेचीच शक्मयता अधिक दिसून आल्यामुळे कर्नाटक भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसला दूर ठेवून कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येणारच, असा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे.
दोन राज्यांतील विधानसभा व दिल्ली मनपा निवडणूक निकालामुळे भाजप, काँग्रेस व आप तिन्ही पक्षांच्या गोटात आनंद व चिंता दोन्ही आहेत. कर्नाटकात भाजपविरुद्ध काँग्रेस लढतीत निजद किती जागा मिळवणार, यावर सत्तेचे गणित ठरणार आहे. मात्र, आपने आपली पाळेमुळे घट्ट केली तर त्याचा फटका निजदला बसणार आहे. गुजरातमध्ये पुन्हा भाजप सत्तेवर येणार, अशी अटकळ होती, ती खरी ठरली. एक्झिट पोलमध्येही हेच अंदाज वर्तविण्यात आले होते. हिमाचल प्रदेशाबाबतीत मात्र अंदाज बऱयापैकी मागेपुढे झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकात कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास भाजप तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपची राष्ट्रीय बैठकही झाली आहे. कर्नाटकात कोणती व्यूहरचना करायची याविषयी हायकमांडची खलबते सुरू आहेत. काँग्रेसही मतांची जुळवाजुळव करण्यात गुंतली आहे. 8 जानेवारी रोजी चित्रदुर्ग येथे अनुसूचित जाती-जमातीचा मेळावा घेण्याचे ठरले आहे. जातीच्या आधारावर मतांचे ध्रृवीकरण करून भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने तयार केली आहे. कर्नाटकात आणखी एका मुद्दय़ावर ठळक चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारांच्या यादीतील अनेक आजी-माजी गुंडांच्या भाजपप्रवेशावर सध्या राजकीय चर्चा रंगली आहे. दोन्ही पक्षांचे नेते या मुद्दय़ावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.
भाजपवर आरोप करणारे काँग्रेस नेते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. आम्ही गुंडांना पक्षात प्रवेश देणार नाही. त्यांना उमेदवारीही देणार नाही. सध्या काँग्रेसमध्ये जे सक्रिय आहेत, ते कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसमध्येही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱया नेत्यांचा भरणार आहे, असा आरोप भाजपने केला आहे. एकीकडे जरा जोर दिला तर कर्नाटकात सत्ता हस्तगत करणे शक्मय असताना काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद काही संपता संपेनात. खासकरून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत संघर्ष वरचेवर डोके वर काढत असतो.
उमेदवारांची नावे कोणीही जाहीर करू नका, असा सल्ला डी. के. शिवकुमार यांनी आपल्याच पक्षातील इतर नेत्यांना दिला आहे. कारण सिद्धरामय्या जेथे जातील तेथे त्या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करीत आहेत. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा नेमकी कोणाकडे आहे? याविषयी संभ्रम निर्माण होत आहे. आधी भाजपच्या भ्रष्टाचाराबद्दल गावोगावी प्रचार करा. काँग्रेसने गोरगरीबांसाठी यापूर्वी ज्या चांगल्या योजना राबविल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचवा, असा सल्लाही शिवकुमार यांनी दिला आहे. हा सल्ला सिद्धरामय्या समर्थकांना पचनी पडेल, असे वाटत नाही.
खाण घोटाळय़ामध्ये अडकून गेल्या अनेक वर्षांपासून विजनवासात असलेले जनार्दन रेड्डी अचानक प्रकाशझोतात आले आहेत. न्यायालयाने त्यांच्या बळ्ळारी जिल्हा प्रवेशावर निर्बंध घातल्यामुळे कोप्पळ जिल्हय़ातील गंगावती येथे त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना पुन्हा राजकीय प्रवेशाचे वेध लागले आहेत. 18 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करा, त्यानंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असे जनार्दन रेड्डी यांनी जाहीर केले आहे. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत जनार्दन रेड्डी रिंगणात उतरणार, हे स्पष्ट झाले आहे. पण खाण घोटाळय़ामुळे बदनाम झालेल्या अद्याप न्यायालयीन लढाई लढत असलेल्या जनार्दन रेड्डी यांना भाजप पुन्हा थारा देणार का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. कारण लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेपासून आपली राजकीय कारकीर्द भाजपमध्ये सुरू झाली. त्यानंतरही भाजपमध्येच आपली वाढ झाली. त्यामुळे भाजपवरच आपली मदार आहे. हायकमांड काय निर्णय घेणार, याची आपण प्रतीक्षा करीत आहोत, असे जनार्दन रेड्डी यांनी जाहीर केले आहे. तब्बल एक तप विजनवासात राहिलेल्या जनार्दन रेड्डी यांना आगामी निवडणुकीत पुन्हा राजकीय जीवदान मिळणार का, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. भाजपने जर जवळ केले नाही तर नवा पक्ष स्थापन करण्याची तयारीही त्यांनी ठेवली आहे, असे दिसते.