मुंबई इंडियन्स-आरसीबी यांच्यात आज सलामी, अवघ्या पाच महिन्यातच पुन्हा आयपीएलचा थरार, मुंबई हॅट्ट्रिकसाठी तर आरसीबी डेडलॉक तोडण्यासाठी सज्ज

वृत्तसंस्था / चेन्नई
अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीतच क्रिकेट रसिकांना आजपासून (शुक्रवार दि. 9) आयपीएलचा रोमांच अनुभवता येणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स व विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघ सलामीच्या लढतीत आमनेसामने भिडणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता या उद्घाटनाच्या सामन्याला सुरुवात होईल.
कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटात होरपळून निघाल्यानंतर गतवर्षी आयपीएलची 13 वी आवृत्ती संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीत खेळवली गेली. त्यानंतर आता यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच यशस्वी करुन दाखवण्यासाठी आयोजकांनी चांगलीच कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात काही खेळाडू, साहायक पथकातील सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असले तरी बायो-बबल प्रणाली यापुढे यशस्वी होईल व स्पर्धा निर्धोकपणे संपन्न होईल, असा आयोजकांना विश्वास आहे.
विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स व अंडर अचिव्हर्स आरसीबीचे बिग हिटर्स आज मैदानात उतरतील, त्यावेळी प्रेक्षकांची सोबत नसेल. पण, तरीही टीव्हीवरुन सामन्याचा आनंद लुटताना प्रेक्षकांना अव्वल दर्जाच्या फटकेबाजीची अपेक्षा असणार आहे. यंदा भारतातच ऑक्टोबरमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून ही आयपीएल स्पर्धा निर्धोकपणे संपन्न झाली तर या विश्वचषक स्पर्धेला देखील एका दृष्टीने हा ग्रीन सिग्नलच असणार आहे.
युवा खेळाडूंसाठी नामी संधी
विश्वचषकाच्या दृष्टीने विराट कोहलीची भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक नजर असेल आणि याचमुळे युवा खेळाडूंना स्वतःचे नाणे खणखणीत वाजवून दाखवण्याची ही नामी संधी असणार आहे. अगदी इयॉन मॉर्गन किंवा केरॉन पोलार्डसारखे खेळाडूंसाठी देखील विश्वचषकापूर्वी आपला व आपल्या खेळाडूंचा फॉर्म आजमावून पाहण्याची संधी येथे असेल. आयपीएल युनिव्हर्समधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माकडून येथे सहाव्या जेतेपदाची अपेक्षा जरुर असेल. मात्र, यासाठी एकापेक्षा एक, दिग्गज प्रँचायझीच्या आव्हानांचा बीमोड करण्याची पुनरावृत्ती या संघाला करावी लागणे क्रमप्राप्त असेल.
रोहित, डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, पंडय़ा बंधू, केरॉन पोलार्ड, ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज खेळाडू हे मुंबईचे बलस्थान असणार आहे. आजच्या लढतीत रोहितसमोर राष्ट्रीय कर्णधार विराट कोहली असेल. त्यामुळे देखील ही जुगलबंदी चांगलीच रंगू शकते.
विराट-एबीडीवर भिस्त
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाची भिस्त प्रामुख्याने कर्णधार विराट कोहली व विस्फोटक फलंदाजीची क्षमता असलेल्या एबी डीव्हिलियर्सवर असणार आहे. आरसीबीने यंदा ग्लेन मॅक्सवेल व काईल जेमिसन यांना नव्याने करारबद्ध केले असून देवदत्त पडिक्कलचा फॉर्म या संघासाठी महत्त्वाचा ठरेल. पडिक्कलने मागील हंगामात आरसीबीतर्फे सर्वाधिक धावांची आतषबाजी केली होती. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या आगमनाची जोरदार वर्दी देणाऱया मोहम्मद सिराज व नवदीप सैनी यांच्याकडून आरसीबीला अपेक्षा असतील.
अन्य संघात धोनीच्या गेमप्लॅनची विशेष उत्सुकता
एरवी स्मित हास्याने मैदानावर उतरणारा धोनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आणखी कमाल दाखवणार का, याची या हंगामात उत्सुकता असेल. ज्याप्रमाणे धोनीच्या चेहऱयावरील दडपण दिसून येत नाही, त्याचप्रमाणे त्याची रणनीतीही दिसून येत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी मॅच प्रॅक्टिसपासून कित्येक कोस दूर आहे. पण, अनुभवाच्या बळावर तो संघसहकाऱयांकडून अव्वल दर्जाची कामगिरी करवून घेणार का, हे प्रत्यक्ष स्पर्धेत स्पष्ट होईल. सुरेश रैनाच्या फलंदाजीकडेही यावेळी लक्ष असेल.
याशिवाय, रिषभ पंत नेतृत्वात किती यशस्वी होणार, स्टीव्ह स्मिथ-अजिंक्य रहाणे वर्चस्व गाजवणार का, आंद्रे रसेल, मॉर्गन फॉर्म दाखवणार का, आदी प्रश्नांची उत्तरे या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतील. याशिवाय, केकेआर, हैदराबाद, राजस्थान, पंजाब, दिल्ली कॅपिटल्स आदी संघांच्या कामगिरीवर देखील यावेळी फोकस असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ऍडम मिल्ने, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंडय़ा, इशान किशन (यष्टीरक्षक), जेम्स नीशम, जसप्रित बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मार्को जेन्सन, मोहसीन खान, नॅथन काऊल्टर नाईल, पीयूष चावला, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंग.
आरसीबी : विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कमल, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, फिन ऍलन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, ऍडम झाम्पा, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डॅनिएल ख्रिस्तियन, केएस भरत, सुयश प्रभुदेसाई, डॅनिएल सॅम्स, हर्षल पटेल.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून.
आयपीएल स्पर्धेतील जेत्यांचा तपशील
- हंगाम विजेते उपविजेते
- 2008 राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपरकिंग्स
- 2009 डेक्कन चार्जर्स आरसीबी
- 2010 चेन्नई सुपरकिंग्स मुंबई इंडियन्स
- 2011 चेन्नई सुपरकिंग्स आरसीबी
- 2012 केकेआर चेन्नई सुपरकिंग्स
- 2013 मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स
- 2014 केकेआर किंग्स इलेव्हन पंजाब
- 2015 मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स
- 2016 सनरायजर्स हैदराबाद आरसीबी
- 2017 मुंबई इंडियन्स रायजिंग पुणे सुपरजायंट्स
- 2018 चेन्नई सुपरकिंग्स सनरायजर्स हैदराबाद
- 2019 मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स
- 2020 मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स
आयपीएल स्पर्धेतील ऑरेंज कॅप विजेते
- हंगाम फलंदाज संघ डाव धावा सर्वोच्च
- 2008 शॉन मार्श पंजाब 11 616 115
- 2009 मॅथ्यू हेडन चेन्नई 12 572 89
- 2010 सचिन तेंडुलकर मुंबई 15 618 89
- 2011 ख्रिस गेल आरसीबी 12 608 107
- 2012 ख्रिस गेल आरसीबी 14 733 128
- 2013 माईक हसी चेन्नई 17 733 95
- 2014 रॉबिन उत्थप्पा केकेआर 16 660 83
- 2015 डेव्हिड वॉर्नर हैदराबाद 14 562 91
- 2016 विराट कोहली आरसीबी 16 973 113
- 2017 डेव्हिड वॉर्नर हैदराबाद 14 641 126
- 2018 केन विल्यम्सन हैदराबाद 17 735 84
- 2019 डेव्हिड वॉर्नर हैदराबाद 12 692 100
- 2020 केएल राहुल पंजाब 14 670 132*
आयपीएल स्पर्धेतील पर्पल कॅप विजेते
- हंगाम गोलंदाज संघ सामने बळी
- 2008 सोहेल तन्वीर राजस्थान 11 22
- 2009 आरपी सिंग डेक्कन चार्जर्स 16 23
- 2010 प्रग्यान ओझा डेक्कन चार्जर्स 16 21
- 2011 लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स 16 28
- 2012 मॉर्नी मॉर्कल दिल्ली डेअरडेव्हिल्स 16 25
- 2013 डेव्हॉन ब्रेव्हो चेन्नई सुपरकिंग्स 18 32
- 2014 मोहित शर्मा चेन्नई सुपरकिंग्स 16 23
- 2015 डेव्हॉन ब्रेव्हो चेन्नई सुपरकिंग्स 17 26
- 2016 भुवनेश्वर कुमार हैदराबाद 17 23
- 2017 भुवनेश्वर कुमार हैदराबाद 14 26
- 2018 ऍन्डय़्रू टाय पंजाब 14 24
- 2019 इम्रान ताहीर चेन्नई सुपरकिंग्स 17 26
- 2020 कॅगिसो रबाडा दिल्ली कॅपिटल्स 17 30