प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचा वाढता प्रसार व लॉकडाऊनमुळे बंद शाळांमधील किलबिलाट सुमारे 2 वर्षांनी आजपासून सुरु होणार आहे. ग्रामीण भागात पहिली ते चौथी, शहरी भागात 1 ली ते 7वीचे वर्गही सुरु करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे जिह्यातील 1 हजार शाळांमधील 75 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन आज 1 डिसेंबरपासून सुरु होत आहे.
कोरोनाचा प्रभाव कायम असला तरी कोरोनाबाधितांची झपाटय़ाने वाढणारी संख्या विचारात घेऊन सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षाचा गेल्या 15 जूनपासून प्रारंभ झाला असला तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांना समोरे जावे लागले होते. जिल्ह्य़ातील 1 लीतील नवागतांचा वर्गातील प्रत्यक्ष शिक्षणाचा श्रीगणेशा झालाच नव्हता. कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होताच शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात 9वी ते 12 वी, त्यानंतर 5 वी ते 8 वी अशा वर्गाना प्रारंभ झाला होता. त्यानुसार ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होते.

गेली 2 वर्षे शाळा बंद असल्याने अप्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोरोनाबाधित कमी झाल्यामुळे नुकतीच पहिली ते चौथीचे वर्गही सुरु करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे जिह्यातील एक हजार शाळांमधील 75 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अध्यापन आज 1 डिसेंबरपासून सुरु होत आहे.
मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांची संमती अत्यावश्यक करण्यात आली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी कोरोना संसर्गापासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी जिह्यात केली जाणार आहे. पालकांच्या बैठका, शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करुन शासनाच्या आदेशाचे काटेकोरपण पालन करावयाचे आहे. रत्नागिरी, चिपळूणसह जिह्यातील शहरी भागातील प्राथमिक शाळांचे वर्ग अद्याप बंदच होते. शासनाच्या आदेशानंतर पालकांच्या संमतीने हे वर्गही सुरु होत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे शाळा बंदच असल्याने पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत प्रवेशच केलेला नव्हता. आजपासून हे सर्व विद्यार्थी प्रत्यक्ष शाळांमध्ये उपस्थिती लावणार आहेत.
शाळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील सूचनांचे पालन अत्यावश्यक आहे.
@शाळा निर्जंतुकीकरण करणे, हात धुण्यासाठी व्यवस्था.
@तापमापक उपलब्ध ठेवणे, वाहनांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण.
@शिक्षकांची शाळेत जाण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी.
@दोन लस घेतलेल्या शिक्षक व कर्मचाऱयांनाच शाळेत प्रवेश.
@एका बाकावर एक विद्यार्थी, दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर.
@मास्क अत्यावश्यक, थुंकण्यावर बंदी, शाळेतील कार्यक्रमांवर बंधने.
@विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थितीसाठी पालकांची संमती आवश्यक.
चौकट 2
इयत्ता विद्यार्थी संख्या
पहिली 17726
दुसरी 17337
तिसरी 19205
चौथी 19317