उर्वरित आयपीएलचा धुमधडाका आजपासून, चेन्नई सुपरकिंग्स-मुंबई इंडियन्स आज आमनेसामने भिडणार
दुबई / वृत्तसंस्था
आयपीएलच्या उर्वरित टप्प्याला आज (रविवार दि. 19) चेन्नई सुपरकिंग्स-मुंबई इंडियन्स यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने सुरुवात होत असून या निमित्ताने एकीकडे, खेळाडूंना टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातमधील वातावरणाशी जुळवून घेण्याची नामी संधी मिळेल तर दुसरीकडे, बीसीसीआयला हा ‘मनी-स्पिनर इव्हेंट’ कोरोनाच्या सावटापासून बराच दूर राहील, अशी अपेक्षा असणार आहे. चेन्नई-मुंबई यांच्यातील आजची लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
यापूर्वी, एप्रिल-मे महिन्यात भारतात कोरोनाची दुसरी लाट आली, त्यावेळी आयपीएल केवळ 29 सामन्यानंतरच अनिश्चित कालावधीकरिता स्थगित करावे लागले होते. त्यानंतर दुसरा ‘टाईम विंडो’ शोधणे आव्हानात्मक होते. मात्र, उर्वरित 31 सामन्यांसाठी टी-20 वर्ल्डकपचा कालावधी बीसीसीआयने निश्चित केला आणि त्यानुसार, आजपासून युएईमध्ये आयपीएलचा उर्वरित टप्पा खेळवला जाणार आहे.
प्रँचायझी क्रिकेट व इंटरनॅशनल कॅलेंडरमध्ये काही तडजोडी झाल्यानंतर उर्वरित टप्प्याची रुपरेषा निश्चित झाली. मागील आठवडय़ात इंग्लंड दौऱयावरील भारतीय पथकात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आणखी एक अनिश्चिततेचे सावट होते. पण, सुदैवाने भारतीय संघातील खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्व मळभ दूर झाले. गतवर्षीची आयपीएल देखील निर्धोकपणे युएईमध्येच संपन्न झाली होती आणि आताही बीसीसीआयला उर्वरित टप्प्यात तीच अपेक्षा असणार आहे.
खेळाडूंसाठी उत्तम संधी
यंदा प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के प्रवेशाला हिरवा कंदील दर्शवला गेला असून 2019 नंतर आयपीएल चाहत्यांसह होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. टी-20 विश्वचषकासाठी यापूर्वीच सर्वांचे अंतिम संघ जाहीर झाले असल्याने आयपीएलमधील प्रदर्शनाचा निवडीवर काहीही फरक पडणार नाही. मात्र, स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी खेळाडूंना हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.
विश्वचषकानंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होत असणारा विराट कोहली आरसीबीचे नेतृत्व साकारताना सातत्याने हुलकावणी देत असलेल्या आयपीएल चषक जेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. गतवर्षी उपजेते ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या गुणतालिकेत आघाडीवर असून येथे ते पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी सुसज्ज असतील. चेन्नई, आरसीबी, मुंबई इंडियन्स हे संघ देखील पहिल्या चारमध्ये समाविष्ट आहेत.
सर्व संघांसाठी नव्याने सुरुवात
आयपीएलच्या या दुसऱया टप्प्यात 31 सामने खेळवले जाणार असून भारताच्या तुलनेत येथील वातावरण व खेळपट्टय़ात बराच फरक असल्याने सर्वच संघांना येथे नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. साखळी फेरीत यापूर्वीच 14 सामने खेळलेल्या मुंबईला नेहमीप्रमाणे ‘स्लो स्टार्ट’ करुन चालणार नाही. त्याचप्रमाणे, डॅड्स आर्मी या नावाने ओळखल्या जाणाऱया चेन्नई सुपरकिंग्ससमोर 2020 मध्ये निराशाजनक कामगिरीच्या कटू आठवणी मागे सारत ताज्या दमाने सुरुवात करण्याचे आव्हान असेल. ऋतुराज गायकवाड, सॅम करणसारखे यंग गन्स, तसेच इम्रान ताहीर, मोईन अली, रविंद्र जडेजासारखे अनुभवी खेळाडू महत्त्वाचे योगदान देऊ शकतील. कर्णधार धोनी व रैना प्रेरणास्थान असणार आहेत.
मुंबईला ‘त्या’ त्रिकुटाकडून अपेक्षा
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा संघ नेहमीप्रमाणे दडपणाखाली दर्जेदार खेळ साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. कर्णधार रोहित शर्मा सातत्यपूर्ण योगदान देईल आणि वर्ल्डकप संघात समाविष्ट झालेले सुर्यकुमार यादव, इशान किशन, लेगी राहुल चहर हे त्रिकूट भरीव प्रदर्शन साकारेल, अशी त्यांची अपेक्षा असणार आहे. स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंडय़ा विश्वचषकाच्या उंबरठय़ावर आपला गोलंदाजीचा कोटा सातत्याने पूर्ण करेल, असे संकेत आहेत.
अनेक दिग्गज बाहेर
पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स व केकेआर या संघांना अनेक दिग्गज खेळाडूंची उणीव जाणवणार असून या स्पर्धेत ते यापूर्वी झगडत राहिले आहेत. पंजाबला डेव्हिड मलान, रिले मेरेडिथ व झाय रिचर्डसनऐवजी तितक्या तोलामोलाचे खेळाडू करारबद्ध करण्यासाठी धावपळ करावी लागली असून त्यांनी ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख जलद गोलंदाज नॅथन इलिसला संघात पाचारण केले. इंग्लंडचा अदिल रशिदही आता या संघातून खेळणार आहे.
केकेआरला पॅट कमिन्सची उणीव जाणवणार असून कमिन्सची जागा टीम साऊदी घेईल. रॉयल्स संघात जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स यापूर्वीही नव्हते. आता त्यात जोस बटलरची भर पडली आहे. लियाम लिव्हिंगस्टोनकडून संघाला बडय़ा अपेक्षा आहेत. 7 सामन्यात केवळ एकच विजय मिळवू शकलेल्या सनरायजर्स हैदराबादला चमत्कार घडवावा लागेल आणि हे करताना त्यांच्याकडे जॉनी बेअरस्टोसारखा दिग्गज खेळाडू उपलब्ध असणार नाही.