प्रतिनिधी / आजरा
कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने गुटखा घेऊन जाणारी मालवाहतूक गाडी पकडून तब्बल 16 लाखांवर किंमतीचा गुटखा पोलीसांनी जप्त केला. रविवार दि. 13 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आजरा पोलीसांनी वेळवट्टी फाट्य़ानजीक ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील हारूगडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग करून चालक शितल जनार्दन पाटील (वय 46, रा. बांदा, ता. सावंतवाडी) याला ताब्यात घेतले.
गाडीची झडती घेतल्यानंतर विविध प्रकारचा सुमारे 16 लाख 34 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. सपोनी हारूगडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक युवराज जाधव, सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी, ठाणे अंमलदार रणजित जाधव, विशाल कांबळे, प्रशांत पाटील, पांडूरंग गुरव, संदीप मसवेकर, संतोष घस्ती, अशोक शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबतची फिर्याद पो. हे. कॉ. पांडूरंग गुरव यांनी पोलीसात दिली असून पुढील तपास सपोनी सुनील हारूगडे करीत आहेत.