क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
आडपई-फोंडा येथील हनुमान स्पोर्ट्स व कल्चरल क्लबने आयोजित केलेल्या ‘पॅडालोन 60’ सायकलींग मॅराथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यात शंभर सायकलस्वारांनी भाग घेतला. आकाश आगरवाडेकर याने सर्वप्रथम ही मॅराथॉन पूर्ण केली.
आडपई येथून सकाळी 5.30 वा. मॅराथॉनला प्रारंभ झाला. उंडीर, करंजाळे, मडकई, कुंडई बायपास, कुंडई सर्कल, मंगेशी बायपास, म्हार्दोळ बायपास, जीव्हीएम सर्कल फर्मागुडी, ढवळी बायपास, ढवळी सर्कल, बोरी, राय, पॅप्सी सर्कल फातोर्डा येथून परत ढवळी बायपास, कपिलेश्वरी, कवळे, दुर्भाट यामार्गावरुन आडपई येथे मॅराथॉनची समाप्ती झाली. 60 कि. मी. ची ही मॅराथॉन पूर्ण केलेल्या सर्व सायकलपटूंना चषक व प्रमाणपत्रे देण्यात आली. समारोप सोहळय़ाला जोस काब्राल व कंपनीचे जोसितो काब्राल, सायकलींग ग्रुप सासष्टी रायडर्सचे समीर नाडकर्णी, नितेंद्र आडपईकर, हनुमान स्पोर्ट्स व कल्चरल क्लबचे अध्यक्ष गौरेश नाईक आदी उपस्थित होते. समीर नाडकर्णी यांनी यावेळी सायकलींग मॅराथॉन आयोजित करुन सायकल वापरण्याच्या प्रसारासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल क्लबचे अभिनंदन केले. सर्वांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनी नाईक आडपईकर यांनी केले. गौरेश नाईक यांनी आभार मानले.