संजना गल्रानीची रवानगी परप्पन कारागृहात
प्रतिनिधी/ बेंगळूर
कन्नड सिनेसृष्टीतील अमली पदार्थ प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणासंबंधी अटकेत असणारी आणखी एक अभिनेत्री संजना गल्रानी हिला देखील कारागृहात जावे लागले आहे. ड्रग्ज प्रकरणी कारागृहात जाणारी ती दुसरी अभिनेत्री आहे. तीन दिवसांपूर्वी अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. संजनाला बुधवारी बेंगळूरच्या प्रथम एसीएमएम न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
राज्यातील ड्रग्ज प्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. संजनाचा देखील ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याने तिला 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. बुधवारी तिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सीसीबी पोलिसांनी तिला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायाधीशांसमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने तिला जामीन नाकारला तसेच 18 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रथम एसीएमएम न्यायालयाने संजना गल्रानीच्या जामीन याचिकेवर 18 सप्टेंबरपूर्वी सत्र न्यायालयाने सुनावणी करावी, असे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे संजनाला शुक्रवारी जामीन मिळेल का, हे पहावे लागणार आहे.
रागिणीला दिलासा नाहीच
ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्य अभिनेत्री रागिणी द्विवेदीला तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. बुधवारी देखील तिच्या जामीन याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे 19 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तिला परप्पन अग्रहार कारागृहात रहावे लागणार आहे.
सिनेस्टार दाम्पत्याची कसून चौकशी
ड्रग्ज प्रकरणी अभिनेता दिगंत आणि अभिनेत्री ऐंद्रीता रै या दोघांची सीसीबी पोलिसांनी बुधवारी कसून चौकशी केली आहे. त्यांच्याजवळील तीन मोबाईल ताब्यात घेऊन अधिक माहितीसाठी एफएसएल प्रयोगशाळेकडे पाठवून देण्यात आले आहे. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर मोबाईल परत करण्याची शक्यता आहे. एक दिवसाची चौकशी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पुरवठेदार बेनॉल्ड उडेन याने दिलेल्या माहितीच्या आधारे सीसीबी अधिकाऱयांनी दिगंत आणि ऐंद्रीता रै या दाम्पत्याला नोटीस जारी केली होती. त्यानुसार ते बुधवारी सकाळी बेंगळूरमधील सीसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. त्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आल्याने त्यांचा डॅग्ज माफियांशी संपर्क होता का? हे स्पष्ट होणार आहे.