प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादाने एका फेरीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-दिल्ली या विमानफेरीला केवळ दीड महिन्यात भरघोस प्रतिसाद मिळाल्याने आणखी एका विमानफेरीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता आठवडय़ातून 3 दिवस बेळगाव-दिल्ली विमान प्रवास करता येणार आहे. यामुळे उद्योजक, सैनिक, राजकारणी यांना दिल्ली प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
13 ऑगस्टपासून स्पाईस जेट कंपनीने दिल्ली-बेळगाव-दिल्ली या मार्गावर विमानफेरी सुरू केली. त्यावेळी सोमवार व शुक्रवार अशी आठवडय़ातून दोन दिवस विमानफेरी सुरू होती. उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच दिल्लीला थेट विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीसह एअरमन टेनिंग स्कूल, टी. ए. बटालियन यांची कार्यालये असल्याने दररोज जवानांची दिल्ली येथे ये-जा असते. दिल्ली येथून उत्तर भारतात प्रवास करणे सोयीचे असल्याने या विमानफेरीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.
80 ते 90 टक्के विमान फुल्ल होऊन वाहतूक करत असल्याने कंपनीने आणखी एक दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे गुरुवारीदेखील बेळगाव-दिल्ली प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आठवडय़ातून 3 दिवस विमानफेरी उपलब्ध होणार आहे. 149 आसन क्षमता असणारे बोईंग विमान उपलब्ध झाल्याने प्रवाशांचीही सोय होत आहे.