अवघा देशच नव्हे जगभर कोरोनावर मात करणाऱया लसीची आतुरतेने वाट पाहिली जाते आहे आणि येणार..येणार अशी या लसीची चर्चा सुरू आहे. पंधरा ऑगस्टला लोक या लसीची वाट पहात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकिल्ल्यावरून काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे कान होते. पण, घोषणा झाली नाही. मोदींनी लस तयार झाली की ती देण्यासाठी सरकारने यंत्रणा उभारल्याचे सांगितले. रशियाने लस शोधली, चीनने शोधली वगैरे बातम्या आणि या लसीबद्दलचे आक्षेप यांची चर्चा होत राहिली. पुण्यात सिरमच्या पुनावालांनी लस संशोधनात प्रगती केली आहे. शरद पवारांनी लस टोचून घेतली अशी अफवा उठली होती. पण पवारांनीच त्याचा खुलासा केला. म्हणाले, मी लस वगैरे घेतलेली नाही. मी बीसीजीचे इंजेक्शन घेतले. थोडक्यात लस तयार नाही, नक्की कधी येणार आणि याची नेमकी तारीख कुणालाच माहिती नाही. कोरोनाने अनेकांचे बळी गेले आणि अनेकजण दवाखाना खर्चाने कर्जबाजारी झाले. हा कोरोना विषाणू चीनमधून सर्वत्र पसरला आणि या विषाणूने सर्वांना घाबरवत अनेकांचा श्वास अडवला. अमेरिकेने तर या व्हायरसला ‘चायना व्हायरस’ म्हणत चीन विरोधात आघाडीच उघडली. मात्र व्यापार व साम्राज्य वाढीवर आक्रमक होत चीन जगभर वेगवेगळय़ा कारवाया करतच राहिला. भारताशी तर चीनने उभा पंगा घेतला असून लडाख सीमेवर युद्धजन्य तणाव निर्माण केला आहे. भारतीय जवान आणि पंतप्रधान मोदी चीनशी सर्व पातळीवर दोन हात करत आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान व अमेरिका यांनी चीन विरोधात एकत्रित मोर्चेबांधणी केली आहे. गलवान खोऱयात चीनने जो हल्ला केला त्याला भारतीय सेनेने चोख उत्तर तर दिलेच पण, अनेक ठिकाणी भारतीय सेनेने ठाणी उभी केली व अटल बोगदा महामार्ग काढून सैन्य सुसज्ज केले. लडाख सीमेवर चीनने साठ हजार सैन्य तैनात केल्याचे वृत्त आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ही माहिती देत भारताला सावध केले आहे व भारताला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. भारत अमेरिकेची ही मदत घेणार, न घेणार हे यथावकाश स्पष्ट होईल पण,अमेरिका वगैरे देश जगभर भांडणे लाऊन आपली शस्त्रs विकतात तोच त्यांचा मुख्य धंदा आहे हे लपून राहिलेले नाही. भारताचे शेजारी चीन, पाकिस्तान, नेपाळ यांनी भारताशी घेतलेला पंगा आणि सीमारेषेवर निर्माण होत असलेला तणाव लक्षात घेता प्रत्येक भारतीयांनी स्वदेशीचा मंत्र अनुसरला पाहिजे. आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वदेशी हे लक्षात घेतले पाहिजे. पण, आजही चीनी आणि विदेशी माल आपल्याकडे खपतो. लहान सहान गोष्टींपासून औषधांपर्यंत आणि लहान मुलांच्या खेळण्यांपासून स्टील व कच्च्या मालापर्यंत अनेक गोष्टी आपण चीनकडून घेतो. आपण चीनला पराभूत करायचे असेल तर ‘मेड ईन चायना’ वस्तूंवर, उत्पादनांवर आणि कच्च्या मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. हळूहळू ही क्रिया सुरू झाली असली आणि चीनी ऍपपासून काही गोष्टींवर सरकारने निर्बंध आणले असले तरी आपली मंडळी अजून शहाणी झालेली नाहीत. स्वदेशीचा नारा बुलंद झाला पाहिजे. मिळालेल्या वृत्तानुसार चीनने कोरोना प्रतिबंधासाठी लस तयार केली आहे आणि ही लस मुंबई आणि ठाणे व भारतात अवैधरित्या विकली जाते आहे. ‘मेड ईन चायना’ची आपल्याकडे संध्याकाळपर्यंत चालली तर चालली, नो गॅरंटी अशी कीर्ती आहे. पण, या कोरोना काळात वाफ घेण्याच्या भांडय़ापासून या लसीपर्यंत चीन धंदा करीत आहे आणि सर्वसामान्य माणसे त्याला बळी पडत आहेत. हे लपून राहिलेले नाही. चीन व्हायरस पाठोपाठ आलेली ही लस मुंबईत अवैधरित्या एक लाख रुपयांना विकली जाते आहे, असे सांगण्यात येत आहे. या लसीला ‘आयसीएमआर’ची संमती नाही. पण, ती चोरून बाजारात उपलब्ध केली जाते आहे. काही औषध विक्रेत्यांना त्यासाठी मेसेज पाठवले जात आहेत. वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी प्रॉडक्टने जून महिन्यात ही लस बनवली आहे आणि देश विदेशात काही श्रीमंत ती घेत आहेत. जगभरचे लोक कोरोनाने त्रस्त असताना आणि नेते, डॉक्टर, योद्धे मास्क व सॅनिटायझरने बांधले गेले असताना चीनी नेते विनामास्क हिंडताना दिसत आहेत आणि चीनच्या अनेक भागात कोरोनाचा फैलाव झालेला नाही. आता तर कोरोनामुक्त चीन असे चित्र रंगवले जात आहे. या पार्श्वभूमीवर ही अवैध कोरोना लस आणि ऑक्सीमीटरपासून वाफेच्या भांडय़ापर्यंत अनेक गोष्टीत धंदा करू पाहणाऱया चीनला रोख लावायला हवा. केवळ कायदे करून आणि आयात बंदी करून भागणारे नाही. साऱया भारत वर्षाने चीनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. स्थानिक कामगार, शेतकरी, कलाकार, उद्योजक यांना कर्तव्यभावनेने हात दिला पाहिजे. सरकार आपल्या पातळीवर निर्णय घेईलच पण, भारतमातेचे पुत्र म्हणून आपणही ठोस काही करायला हवे. अवैधपणे होत असलेली या लसीची विक्री हाणून पाडली पाहिजे. औषध विक्रेत्या संघटना, डॉक्टर आणि सर्वसामान्य जनता यांनी सतर्क राहिले पाहिजे. डिसेंबरमध्ये भारत सरकारची कोरोना प्रतिबंधक लस येईल व जून 2021 पर्यंत ती सर्वांना उपलब्ध होईल असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. कोरोनाची आकडेवारी देशभर दिलासाजनक होते आहे. पण, आता दसरा, दिवाळीनिमित्ताने पुन्हा गर्दी व संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाची आणखी एक लाट येणार अशी वदंता आहे. सतर्क राहिले पाहिजे आणि चीनी व्यापार, प्रलोभन आणि चाल यांना धुडकावून लावत चीनचे मनसुबे उधळले पाहिजेत. चीन, पाकिस्तान, आपले शत्रूराष्ट्र आहेत. यांचे चुकूनही विस्मरण नको. शत्रूराष्ट्राची चोर पावले ओळखली पाहिजेत. चीनची लस उधळून लावा आणि मास्क हिच लस समजून सावधानता पाळा, त्यातच देशहित आहे, स्वहित आहे.
Previous Articleएक अजब सहल
Next Article आजचे भविष्य सोमवार दि. 12 ऑक्टोबर 2020
Related Posts
Add A Comment