प्रतिनिधी/ पणजी
व्यावसायिक आणि घरगुती पाणी वापरकर्त्यांनी थकविलेल्या बिलांच्या वसुलीसाठी राज्य सरकारने आता एकरकमी परतफेड योजना अधिसूचित केली आहे. त्याद्वारे 124 कोटी रुपयांची वसुली होण्याची आशा सरकारने व्यक्त केली आहे. या योजनेसंबंधी हल्लीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सूतोवाच केले होते.
यापूर्वी गत महिन्यातच सरकारने वीज बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना जाहीर केली होती. त्या योजनेला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे आता त्याच धर्तीवर पाणी बिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी योजना जाहीर केली आहे.
व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांनी कोटय़वधींची पाणी बिले थकविली आहेत. या बिलांची वसुली कशी करावी हे मोठे आव्हान सरकारसमोर उभे होते. त्यावर उपाय म्हणून आता ’थकबाकी वसुलीसाठीची एकरकमी परतफेड योजना 2021’ ही योजना अधिसूचित करण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाप्रमाणेच ही योजनाही यशस्वी होईल असा विश्वास सरकारला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या योजनेची कार्यवाही होणार आहे. 31 ऑक्टोबर 2020 ही शेवटची तारीख धरून थकलेल्या सर्व बिलांसाठी ही योजना लागू असेल आणि परतफेडीसाठी एका महिन्याचा अवधी देण्यात येणार आहे.