आणखी एक काऊंटर सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी/बेळगाव
शहर तसेच परिसरातील पोस्ट कार्यालयात आधार नोंदणी केली जात आहे. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात आधार नोंदणी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. परंतु सध्या एकच काऊंटर सुरू असल्याने नागरिकांना कार्यालया बाहेर ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी एक काऊंटर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
नागरिकांना आधार नोंदणी करणे सोयीचे होण्यासाठी सरकारने पोस्ट कार्यालय तसेच बँकांमध्ये नोंदणी सेवा केंद्र सुरू केले. शहरातील काही निवडक बँकांमध्ये ही सेवा देण्यात आली आहे. मुख्य पोस्ट कार्यालयासोबतच उपनगरांमधील प्रमुख पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केली जात आहे. मुख्य पोस्ट कार्यालयात दररोज 80 ते 100 आधार नोंदणी केली जात आहे. तर इतर कार्यालयांमध्ये दररोज 30 ते 40 व्यक्तींची नोंदणी करून घेतली जात आहे.
बाहेर आधार नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. त्यामुळे पोस्ट कार्यालयात आधार नोंदणी करणे नागरिकांसाठी सोयीचे ठरत आहे. यामुळे सकाळपासून नागरीक टोकन नंबर घेऊन आधार नोंदणीसाठी येत आहेत. परंतु दररोज शेकडो जण या परिसरात येवून गर्दी करत आहेत. यामुळे कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आणखी एक आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.