दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक
वार्ताहर / चौके:
मालवण-चौके मार्गावरील आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ववळी येथे दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात हेमंत गणपत परब (56, रा. आंबेरी) व गणेश चारुदत्त मुननकर (24, रा. तारकर्ली) हे दोघेही गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना रुग्णवाहिकेने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी दोघांनाही ओरोस येथे हलविण्यात आले.
सोमवारी दुपारी हेमंत गणपत परब हे टीव्हीएस ज्युपिटर या दुचाकीने मालवणहून चौकेच्या दिशेने येत होते. याच सुमारास गणेश चारुदत्त मुननकर हा युवक बजाज कंपनीच्या दुचाकीने चौकेहून मालवणच्या दिशेने जात होता. आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ रस्त्यावर दोन्ही दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले.
जखमींना रुग्णालयात हलविले
मंदार गावडे, शेखर गाड, अनिल सुकाळी, भाऊ वाईरकर, सुनील वरवडेकर, राजन सारंग, सचिन आंबेरकर, सुशिल डिचोलकर यांनी दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेने मालवण रुग्णालयात पाठविण्यास मदत केली. अपघातात हेमंत परब यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. गणेश मुननकर याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. ग्रामीण रुग्णालय येथे डॉ. बालाजी पाटील यांनी जखमींवर उपचार केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, सिद्धेश चिपकर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते.