- मुंबईत लसीकरणाला सुरुवात
ऑनलाईन टीम / मुंबई :
आपण आज हे एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत. मात्र, या कोरोनाच्या कठीण काळात रुग्णालये पुरत नव्हती, अशा वेळी कोविड सेंटरचा आधार कोरोनाच्या काळात मिळाला. तसेच या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कोरोना योद्ध्यांना मानाचा मुजरा केला.

मुंबईतील राज्याव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बीकेसीमधी लसीकरण केंद्रावर महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. कोरोना लसीचे मला राजकारण करायचे नाही. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना लस दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज लस आपल्या हाती आली आहे, पण अजूनही संकट टळलेले नाही. त्यामुळे लस घेतल्यावर देखील काळजी घेण्याची गरज आहे. तसेच तोंडावरचा मास्क हीच सर्वात चांगली लस आहे, त्यामुळे लासिकरणानंतरही सोशल डिस्टन्सचे पालन आणि मास्क घालणे, अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मुंबईत डॉ. मधुरा पाटील यांना पहिली लस देण्यात आली. राज्यातील 285 केंद्रावर ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.