ईएसआयसीच्या लाभार्थींना मोठा दिलासा- कर्मचाऱयांना मिळणार चांगल्या सुविधा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कर्मचारी राज्य विमा निगमने (ईएसआयसी) स्वतःच्या लाभार्थींच्या सेवांच्या पुरवठय़ात सुधारणा व्हावी याकरता अनेक पावले उचलली आहेत. ईएसआयसी आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थींना घरानजीक कुठल्याही खासगी रुग्णालयात उपचार करविण्याची सुविधा मिळाली आहे. आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थीच्या घरापासून 10 किलोमीटरच्या कक्षेत ईएसआयसीचे रुग्णालय नसल्यास संबंधित कर्मचारी राज्य विमा निगमच्या पॅनलमध्ये सामील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाऊ शकतो.
राज्य सरकारांनी स्वतः रुग्णालये चालविण्यास भर न दिल्यास सर्व नवी रुग्णालये आणि भविष्यात निर्माण होणाऱया रुग्णालयांचे संचालन ईएसआयसीकडून करण्यात येणार आहे. कर्मचाऱयांच्या मागणीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. लाभार्थींना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे हा याचा उद्देश असल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.
कामगार तसेच रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 183 व्या बैठकीत कर्मचारी राज्य विमा निगमने कर्मचाऱयांसाठी वैद्यकीय सेवा आणि अन्य लाभांच्या पुरवठय़ात सुधाराकरता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
कर्मचाऱयांना मोठा दिलासा
ईएसआयसीने स्वतःच्या सर्व सदस्य किंवा लाभार्थींना आपत्कालीन स्थितीत नजीकच्या कुठल्याही खासगी रुग्णालयात उपचार करवून घेण्याची अनुमती दिली आहे. विद्यमान व्यवस्थेच्या अंतर्गत ईएसआयसीच्या योजनेत येणाऱया व्यक्ती तसेच लाभार्थींना पॅनलमध्ये सामील किंवा त्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचारापूर्वी ईएसआयसी रुग्णालयात जात तेथून रेफर करवून घ्यावे लागते.
24 तासांत अनुमती आवश्यक
एखाद्या लाभार्थीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासल्यास संबंधित रुग्णालयाला 24 तासांच्या आत ऑनलाईन माध्यमातून ईएसआयच्या प्राधिकृत अधिकाऱयाकडून अनुमती प्राप्त करावी लागणार आहे, जेणेकरून लाभार्थीला रोख मदतीसह आरोग्य देखभालाची सुविधा उपलब्ध करविण्यात यावी. यासंबंधी ईएसआयसी मुख्यालयाकडून प्रसिद्ध दिशानिर्देश ईएसआयसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.