कुडचडे पालिकेच्या नावाने बनावट ‘ना हरकत दाखला’ देण्यात आल्याचाही दावा
प्रतिनिधी / कुडचडे
काकोडा-कुडचडे येथील माजी नगरसेवक आनंद प्रभुदेसाई यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला असून तशी तक्रार पोलिसांत दाखल केल्याची माहिती त्यांनी पत्रकार पारिषद घेऊन दिली आहे. त्याचबरोबर कुडचडे पालिकेच्या नावाने जारी करण्यात आलेल्या बनावट ना हरकत दाखलाप्रकरणी ताबडतोब चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गुरुवारी संध्याकाळी आपण कुडचडे पालिकेतील नगराध्यक्षांच्या कक्षातून बाहेर पडून घरी जात असताना अचानक एक चारचाकी वाहन एकदम वेगाने आपल्या दिशेने आले व मडगावकडील रस्त्याने गेले. वेळीच आपले लक्ष गेले नसते, तर आपल्या जिवावर बेतले असते. त्यामुळे आपण कुडचडे पोलीस स्थानकात प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार केली आहे. यामागे राजकीय रोष असू शकतो, असा दावा प्रभुदेसाई यांनी केला. सदर चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकावर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
बनावट दाखलाप्रकरणी चौकशी व्हावी
कुडचडे पालिका सध्या कोणाच्या हातात आहे हे ते समजत नाही. कारण कुडचडे पालिकेत सध्या बनावट दस्तऐवज देण्याचे काम बिनधास्त करण्यात येत आहे. नुकत्याच पुढे आलेल्या एका प्रकरणात एका व्यक्तीला कर्ज काढण्यासाठी जो ना हरकत दाखला दिला गेला आहे तो बनावट असल्याचे उघड झाले आहे, असा दावा प्रभुदेसाई यांनी याप्रसंगी केला.
कारण जो ना हरकत दाखला देण्यात आला आहे त्या काळात कोणीच नगराध्यक्षपदावर विराजमान नव्हते व ज्या नगराध्यक्षांची या दाखल्यावर सही आहे ती व्यक्ती 2015 मध्ये नगराध्यक्षपदी विराजमान होती. त्याचबरोबर जो आऊटवर्ड क्रमांक या दाखल्यावर टाकण्यात आला आहे तो क्रमांक याअगोदर पालिकेच्या मुख्याधिकाऱयांनी बँकेला पाठविलेल्या पत्राचा आहे. तसेच सदर बनावट दाखल्यावर गोवा सरकारचे चिन्ह छापलेले आहे, जे पालिकेच्या कोणत्याच दस्तऐवजावर छापले जात नाही, असा दावा यावेळी प्रभुदेसाई यांनी केला. या प्रकरणी ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सध्या पालिकेत जो अविश्वासाचा खेळ सुरू आहे तो अशाच प्रकारची कारस्थाने करण्यासाठी असून लोकांनी आताच सावध व्हायला हवे व जी हुकूमशाही कुडचडेत सुरू आहे त्यावर मात करण्याचे धाडस केले पाहिजे, असे प्रभुदेसाई पुढे म्हणाले.