रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ, नव्या लाटेची शक्मयता, साहाय्य करण्याचे आवाहन
आफ्रिका खंड आणि लॅटिन अमेरिका हे दोन भूभाग कोरोना उदेकाची नवी केंद्रे बनत आहेत, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. प्रारंभीच्या काळात या दोन्ही भूभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण अत्यल्प प्रमाणात होते. त्यामुळे त्यांनी कोरोनावर विजय मिळविला आहे, अशी समजूत होती. तथापि, आता ती खोटी ठरत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणणे आहे.
आफ्रिका खंडात रुग्णसंख्या आजही कमी भासत असली तरी प्रत्यक्षात ती प्रचंड प्रमाणात आहे. या खंडातील बऱयाच गरीब देशांमध्ये कोरोना चाचणीची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथे अत्यल्प प्रमाणात चाचण्या होत आहेत. परिणामी अनेक देशांमध्ये कोरोनाची लागण न झाल्याच्या समजुतीतून लॉकडाऊनसारखे कठोर उपाय करण्यात आलेले नाहीत. परिणामी या दोन्ही ठिकाणी अज्ञात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.
लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको, ब्राझिल, पेरु, उरुग्वे, अर्जेंटिना आणि चिली या देशांमध्ये आतापर्यंत दहा लाखांहून अधिक रुग्ण सापडलेले आहेत. यापैकी 6 लाख केवळ ब्राझिलमध्येच आहेत. तसेच ब्राझिलमध्ये 35 हजार जणांचा मृत्यू कोरोना बाधेमुळे झालेला आहे. मेक्सिको, उरुग्वे, पेरु आदी देशही याच मार्गावर जात आहेत. त्वरित कठोर उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या सूत्रांनी दिली आहे.
लॅटिन अमेरिकन देशांमध्ये तसेच मध्य आफ्रिकेतील काही देशांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कमी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे ही कोरोना उदेकाची नवी केंदे बनत आहेत. मध्य आफ्रिकेतील देशांमध्ये गरिबी, अशिक्षितपणा आणि दुर्लक्षामुळे तसेच राजकीय अस्थिरतेमुळेही कोरोनाची परिस्थिती बिकट आहे.
त्वरित उपाययोजना आवश्यक
लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडाचा काही भाग येथील कोरोना परिस्थितीवर हाताबाहेर जाण्यापूर्वीच मात करण्यासाठी त्या देशांची प्रशासने आणि जागतिक आरोग्य संघटना तसेच विश्वपातळीवर काम करणाऱया इतर बिगर प्रशासकीय संस्था (एनजीओ) यांनी एकत्रितरीत्या प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक सदस्य देशांनी केले आहे.
जागतिक साहाय्य आवश्यक
आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत कोरोना नियंत्रणात न आल्यास त्याचा जगात सर्वत्र परिणाम जाणवू शकतो. तसेच कोरोना विषाणूची दुसरी तीव्र लाट येऊ शकते. त्यामुळे या दोन खंडांमधील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिपादन आहे. जगातील विकसित देशांनी प्रयत्न करून जागतिक निधी उभा करून तो गरीब देशांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच कोरोना युद्धासाठी आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठाही या देशांना करावा लागेल. आफ्रिकेप्रमाणे आशिया खंडातील काही गरीब देशांमध्येही परिस्थिती काय आहे, याचा नेमका अंदाज करता येणे अशक्मय झाले आहे. अफगाणिस्तान व आग्नेय आशियातील दोन-तीन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पाकमध्ये भयावह स्थिती

इस्लामाबाद : शुक्रवारी एकाच दिवसात पाकिस्तानमध्ये नव्या 4 हजार 896 रुग्णांची नोंद झाली असून हा एकदिवशीय उच्चांक आहे. त्यामुळे एकंदर बाधितांची संख्या 89 हजार 249 झाली आहे. तर एकंदर मृत्यूंची संख्या 1 हजार 883 पर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारच्या 24 तासांत 68 जणांचा मृत्यू झाला. 31 हजार 198 रुग्ण बरे झाले आहेत. तरीही बरे झालेल्यांचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे.
हा चिंतेचा विषय असल्याची कबुली पाक प्रशासनाने दिली आहे. पाकमधील अमेरिकन राजदूतावासाच्या एका अधिकाऱयाला कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याला अमेरिकेत परत बोलावून घेतले आहे.
सिंगापूरमध्ये रुग्णवाढ

सिंगापूर : शुक्रवारच्या 24 तासांत सिंगापूरमध्ये नव्या 517 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 13 रुग्ण भारतीय वंशाचे आहेत. या देशात कोरोनाची एकंदर रुग्णसंख्या 36 हजार 922 असून आतापर्यंत 24 मृत्यू झाले आहेत. 12 हजार 691 रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून 303 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 23 हजार 904 रुग्ण बरे झाले आहेत. फैलाव चिनी नागरिकांमध्ये सर्वाधिक आहे.
औषधाचा अहवाल मागे

बोस्टन : हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या मलेरियावर घेतल्या जाणाऱया औषधाचा कोरोनावर गुण येत नाही, असा अहवाल काही अमेरिकन संशोधकांनी दिला आहे. तसेच या औषधामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले, अशी माहिती देण्यात आली आहे. तथापि, आता हा वादग्रस्त अहवाल मागे घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा अहवाल लान्सेट स्टडी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या औषधासंबंधी नवा विचार सुरू झाला आहे.
इटली-स्पेनमध्ये नियंत्रण

रोम : प्रारंभी प्रचंड कोरोना रुग्णसंख्या असलेल्या इटली, फ्रान्स आणि स्पेन या युरोपियन देशांमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटनमध्येही नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. इटलीमध्ये शुक्रवारच्या 24 तासांत केवळ दोनशेच्या आसपास नवे रुग्ण आढळले. तर फ्रान्समध्ये ही संख्या शंभराहून कमी होती. एकंदर स्थिती नियंत्रणात आहे.
वुहान पुन्हा कोरोनामुक्त

बीजिंग : कोरोनाचा जागतिक उदेक ज्या ठिकाणी प्रथम झाला त्या चीनमधील वुहान शहरातील शेवटचे तीन कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. अशा तऱहेने वुहान शहर गेल्या चार आठवडय़ांमध्ये दुसऱयांदा कोरोनामुक्त झाले आहे. दोन आठवडय़ांपूर्वी तेथे पंधरा नवे रुग्ण सापडले होते. त्यामुळे शहरात पुन्हा काही भागात लॉकडाऊन करण्यात आला होता. आता या शहरात रूग्ण नाही.
मध्य-पूर्वेत नवी लाट

दुबई : मध्य-पूर्वेतील दुबई, अबुधाबी, शारजाह, कतार इत्यादी देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या नव्याने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे या देशांच्या प्रशासनांनी एकत्रितरीत्या नवे निर्बंध घालण्याची तयारी सुरू केली आहे. नव्या वाढीमुळे येथील रुग्णांची संख्या आता 5 हजारपेक्षा अधिक झाली आहे. सौदी अरेबियामध्ये मात्र नव्या रुग्णवाढीचा दर घटला असून स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा तेथील प्रशासनाने केला.