ऑनलाईन टीम / कोलकाता
पश्चिम बंगलामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पायाला फ्रॅक्चर असताना बंगालमधील बांकुरा येथील प्रचार रॅलीत मंगळवारी सहभाग घेतला. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी दुर्गापाठ म्हणून दाखवला व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आमच्याशी टक्कर घ्यायला जाऊ नका, मातीत मिसळून जाल असा इशाराच ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपला दिला.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, बंगालमध्ये भाजपची मनमानी चालवून घेणार नाही. केंद्र सरकार देशातील सरकारी कंपन्या विकत आहे. यासोबतच वाढलेल्या गॅस व पेट्रोलच्या किमतीवरून देखील त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोक भाजपच्या प्रचार रॅलीत सहभागी होण्यास तयार नाहीत म्हणूनच भाजपाकडून पैसे देऊन लोकांना प्रचार सभेला आणले जात आहे. तसेच शेतकऱ्यांना सहा हजार रूपये देऊन भाजपाला त्यांचे मत मिळवायचे असल्याचे देखील यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांच्या पायाच्या दुखापतीवर निवडणूक आयोगाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या मुद्दयावरून देखील ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. निवडणूक आयोग अमित शहा चालवत असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.