डिझेलअभावी स्वॅब पडून असल्याच्या घटनेची दखल
राज्य सरकारवर जोरदार टीका : कोटय़वधीच्या बाता मारणाऱया सरकारकडे डिझेलसाठीही पैसे नाहीत!
प्रतिनिधी / कणकवली:
डिझेलसाठी पैसे नसल्याने कोरोना स्वॅब कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पडून असल्याच्या घटनेची आमदार नीतेश राणे यांनी गंभीर दाखल घेतली. शनिवारी सकाळीच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. शासनाचे पैसे मिळेपर्यंत कणकवलीतून कोरोना टेस्टसाठी स्वॅब ओरोसला नेण्यासाठीचे डिझेल तर ऑक्सिजन गॅस आणण्यासाठी स्वखर्चाने डिझेल भरून खासगी गाडी उपलब्ध करून देत असल्याची ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी दिली. यावेळी राणे यांनी आरोग्य उपसंचालकांशी संपर्क साधत त्यांनाही धारेवर धरले.
दरम्यान, 300 कोटींच्या विकासनिधीची बाता मारणाऱया सत्ताधाऱयांना कोरोना टेस्ट सेंटरमधून स्वॅब ओरोसला नेण्यासाठी गाडीत डिझेल घालायला पैसे नाहीत. सरकार आणि प्रशासन सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. हा जनतेचा अपमान आहे. ठाकरे सरकारला आणि पालकमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राणे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
कोरोना टेस्टसाठी घेण्यात आलेले स्वॅब ओरोसला नेण्यासाठी वाहनात डिझेल टाकायला पैसे नसल्याने स्वॅब दोन दिवस उपजिल्हा रुग्णालयातच पडून असल्याची बातमी ‘तरुण भारत’मध्ये शनिवारी प्रसिद्ध होताच आमदार राणे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एम. शिकलगार आणि डॉ. सतीश टाक यांच्याशी राणे यांनी चर्चा केली. पत्रव्यवहार करूनही आरोग्य उपसंचालकांकडून निधी उपलब्ध करून दिला नाही. रुग्णवाहिकेमध्ये डिझेल भरण्यासाठीही निधी नाही. आम्ही स्वतःच्या खिशातून डिझेल भरून पेशंटसाठी ऑक्सिजन आणले. मात्र, वरिष्ठ पातळीवरून निधी दिला जात नसल्याचे यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणेच्या या गंभीर स्थितीची माहिती मिळताच राणे यांनी आजपासून कोरोना टेस्टसाठी घेतलेले स्वॅब ओरोसला पोहोचविण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होईपर्यंत आपण गाडीसाठी डिझेल उपलब्ध करून देतो. तसेच ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी आपण स्वत: डिझेलसह गाडी उपलब्ध करून देत असल्याची ग्वाही दिली.
या प्रकाराबाबत राणे म्हणाले, शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या बाता मारणारे ठाकरे सरकार आणि कोटय़वधीचा निधी जिल्हा विकासासाठी आणला म्हणणाऱया पालकमंत्र्यांनी थोडी तरी लाज बाळगावी. कोरोना टेस्टसाठी स्वॅब ओरोसला नेण्यासाठी गाडीत डिझेल नाही म्हणून स्वॅब जर उपजिल्हा रुग्णालयात पडून असतील तर जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱया या सत्ताधाऱयांचे करायचे काय? तूर्तास मी स्वखर्चाने जनतेची गैरसोय दूर व्हावी, यासाठी डिझेल भरून माझी खासगी गाडी उपजिल्हा रुग्णालयाला दिली आहे. मात्र, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक निधीबाबत जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱयांची तातडीची बैठक घेणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्राr, नगर पंचायतीच्या बांधकाम सभापती मेघा गांगण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर उपस्थित होते.