उदय सावंत/ शेळ मेळावली
शेळ मेळावलीत उभारण्यात येणाऱया आयआयटी प्रकल्पाविरुद्धचे आंदोलन काल मंगळवारी पुन्हा चिघळले. सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळताच आयआयटी विरोधकांनी मंगळवारी सकाळपासून दिवसभर रस्त्यावर ठाण मांडले. आंदोलकांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त, सुमारे सहा तास चाललेला संघर्ष आणि त्यातच पुरुष पोलिसांनी महिलाना ढकलण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले. सरकारने चोरटय़ा मार्गाने काम हाती घेण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे आज बुधवारपासून कायदा हातात घेऊन आंदोलन करण्याचा इशारा मेळावली बचाव समितीने दिला आहे.
जवळपास साडेतीन हजार कोटी खर्चून शेळ मेळावली याठिकाणी गोवा सरकारतर्फे आयआयटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 13 लाख चौरस मीटर जमीन संपादित करण्यात येणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून या प्रकल्पाला तीव्रतेने विरोध होताना दिसत आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या माध्यमातून आंदोलने करण्यात येत असून हा प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही किंवा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतलेला आहे.

संपूर्ण गोव्यातील जनतेला केले होते आवाहन
मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आंदोलकांनी घटनास्थळी जमवाजमव करून प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्यास सुरुवात केली. महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. एक चित्रफित प्रसिद्ध करून आंदोलकांनी गोव्याच्या वेगवेगळय़ा क्षेत्रात असलेल्या सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, समाजकार्यकर्ते यांना आवाहन करून प्रकल्पाला जोरदारपणे विरोध करण्यासाठी हातात हात मिळवून आम्हाला सहकार्य करा. सरकार साडेपाचशे पोलीस तैनात करून आम्हाला अटक करणार आहे. त्यामुळे आमच्या बचावासाठी तुमचे पाठबळ द्या, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते. याला अनुसरून गोव्याच्या वेगवेगळय़ा भागातून सामाजिक संस्थांचे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी खासकरून काँग्रेस, आमआदमी पक्षांचे कार्यकर्ते या आंदोलनात सकाळपासून सहभागी झाले होते.
वरिष्ठ अधिकाऱयांसह मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात
वेगवेगळय़ा पोलीस स्थानकातील पोलीस व गोवा राखीव दलाच्या तुकडय़ा मुरमुणे भागात सकाळी आठ वाजल्यापासून तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आंदोलनाच्या विरोधात सरकारने दोन हात करण्याची तयारी दर्शवल्याचे चित्र पहावयास मिळाले. सत्तरीचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, मामलेदार दशरथ गावस, पोलीस उपअधीक्षक गुरुदास गावडे, पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस फौजफाटा तैनात होता.
मशाल प्रज्वलनाने आंदोलनाची सुरुवात
मुरमुणे येथे मशाल प्रज्वलित करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ही मशाल म्हणजे या भागातील प्रत्येक नागरिकाच्या अंगात असलेला रक्ताच्या थेंबाचे रुप असून त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही मशाल प्रज्वलित करण्यात आलेली आहे. आता ही मशाल आंदोलनाचे उग्र रूप दाखविणार आहे. त्यातून सरकारला हादरे बसतील, अशाप्रकारचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. आंदोलकांमध्ये ऊर्जा निर्माण करणाऱया व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पोलिस व आंदोलकांमध्ये संघर्ष निर्माण झाला.
आंदोलकांना हुलकावणी देत सर्वेक्षण सुरु
चार महिन्यापूर्वी सुरु केलेले जमिनीचे सर्वेक्षणाचे आंदोलकांनी बंद पाडले होते. आज ते काम पुन्हा सुरू होणार असल्याचे समजताच मुरमुणे येथे आंदोलक रस्त्यावर उतरून विरोध करत होते. मात्र सरकारने आंदोलकांना हुलकावणी देत दुसऱया बाजूने सकाळी नऊ वाजल्यापासूनच सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली. ज्याठिकाणी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वेगळा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
सर्वेक्षणाच्या ठिकाणी निर्माण झाला तणाव
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आंदोलकांना सर्वेक्षण सुरु झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी सर्वेक्षणाचे काम सुरू होते त्या ठिकाणी धाव घेऊन त्याला जोरदार विरोध केला. यावेळी प्रचंड प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सरकारने आम्हाला फसवून सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सदर सर्वेक्षण आम्हाला मान्य नाही, अशा प्रकारचा तीव्र संताप व्यक्त करीत अनेकांनी पोलिसांच्या गाडीवर आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. ज्यावेळी आंदोलक सदर काम बंद करण्यासाठी घटनास्थळी गेले त्यावेळी सर्वेक्षणाचे काम संपले होते. मात्र काही कर्मचाऱयांना आंदोलकांनी धमक्मया देऊन हाकलून लावले.
आंदोलकांनी लावली गवताला आग
आंदोलकांनी पोलिसांच्या गाडय़ा ठेवण्यात आल्या होत्या सदर ठिकाणच्या सुक्मया गवताला आग लावून दिली. त्या ठिकाणी असलेल्या बसेसना धोका निर्माण झाला. यामुळे मोठय़ा प्रमाणात खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी धाव घेऊन गाडय़ा याआगीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक बस खड्डय़ात पडली मात्र ती बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला.
दारुचे दुकान बंद पाडले
आंदोलन सुरू होण्यापूर्वी सदर भागांमध्ये असलेली दारूची दुकाने बंद करण्यासाठी महिला भगिनीनी सदर दुकानाकडे धाव घेऊन सदर दुकान बंद करण्याची मागणी केली. यावेळी दुकानमालक व महिला आंदोलकामधे बऱयाच प्रमाणात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी सदर दुकान बंद पाडण्यास आंदोलक यशस्वी ठरले.