अबु धाबी / वृत्तसंस्था
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने रविवारी दुसऱया क्वॉलिफायर लढतीत 17 धावांनी खणखणीत विजय संपादन करत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला. येथील दुसऱया व शेवटच्या क्वॉलिफायर लढतीत त्यांनी सनरायजर्स हैदराबादची झुंज संपुष्टात आणली. प्रारंभी, 9 बाद 189 धावांचा डोंगर रचल्यानंतर त्यांनी हैदराबादला 8 बाद 172 धावांवर रोखले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयासाठी 190 धावांचे कठीण आव्हान असताना हैदराबादतर्फे केन विल्यम्सनने 45 चेंडूत 67 धावांची आतषबाजी केली तर समदने 16 चेंडूत जलद 33 धावा फटकावल्या. मात्र, निर्णायक टप्प्यात फटकेबाजीची आवश्यकता असताना त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले अािण येथून विजय त्यांच्या हातातून निसटत राहिला. या स्पर्धेतील जेतेपदाची लढत आता मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात उद्या (मंगळवार, दि. 10) होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता लढतीला सुरुवात होणार आहे.