कपिलदेवची धोनीबाबत सूचना
महेंद्रसिंग धोनीने पूर्ण वर्षभरात एकही सामना खेळला नाही तर त्याला ‘मॅच प्रॅक्टिस’ नसेल आणि अशा स्थितीत त्याने आयपीएल ते आयपीएल इतकेच खेळायचे ठरवले तर उत्तम प्रदर्शन साकारणे कठीण असेल, असे स्पष्ट मत महान क्रिकेटपटू, भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिलदेव यांनी मांडले आहे. एकीकडे, कपिल यांच्या प्रकृतीबाबत वॉटसअपवरुन अफवा पसरवण्याचा घृणास्पद प्रकार सुरु असताना, दुसरीकडे, कपिल यांनी स्वतः एका व्हीडिओद्वारे संपर्क साधला आणि त्यानंतर धोनीबाबत आपले मतही मांडले.
चेन्नई सुपरकिंग्सचा संघ यंदा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्ले-ऑफ पूर्वीच गारद झाला, त्यावेळी धोनीचा त्यात 14 सामन्यात केवळ 200 धावांचा वाटा राहिला. पूर्ण स्पर्धेत त्याला एकदाही सूर सापडला नाही. त्याच्या खेळीत एकाही अर्धशतकाचा समावेश राहिला नाही आणि त्याचा स्ट्राईक रेट देखील 116 इतका खराब राहिला. त्या पार्श्वभूमीवर कपिलदेव बोलत होते.

कपिलदेव यांना हृदयविकाराचा धक्का येऊन गेल्यानंतर नुकतेच त्यांच्यावर अँजिलोप्लॅस्टी केली गेली असून माजी कर्णधार धोनीकडून त्यांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. धोनीला फॉर्म कायम ठेवायचा असेल तर त्याने किमान प्रथमश्रेणी क्रिकेट तरी खेळत राहायला हवे, असे त्यांना वाटते.
‘धोनीने प्रत्येक वर्षी फक्त आयपीएल स्पर्धाच खेळत रहायचे ठरवले तर त्याला सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारत राहणे कठीण असेल. तो 39 वर्षाचा आहे. पण, येथे वयाबद्दल बोलणे रास्त ठरत नाही. उलटपक्षी, तो जितका खेळत राहील, तितकी त्याला शरीराची साथ लाभत राहील. पण, याचवेळी जर तुम्ही 10 महिने अजिबात क्रिकेट खेळला नाहीत आणि अचानक दोन-एक महिने आयपीएल खेळण्यासाठी मैदानात उतरला तर काय होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण अनुभवी खेळाडू असाल किंवा नवोदित, मॅच प्रॅक्टिस असायलाच हवी. अन्यथा काय होते, हे पडताळून पहायचे असेल तर ख्रिस गेलचे उदाहरण आपल्यासमोर आहे’, याचा कपिल यांनी पुढे उल्लेख केला.
धोनीने आपण आयपीएलमधून लवकर निवृत्त होणार नाही, असे स्पष्ट केले असले तरी उत्तम खेळत राहणे त्याच्यासाठी आव्हानात्मक असेल, हे निश्चित आहे आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱया कपिलदेवनी त्यावरच अंगुलीनिर्देश केला आहे. धोनी यापासून बोध घेत प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत राहिला तर त्या-त्या संघातील नवोदित खेळाडूंना देखील त्याच्यापासून बरेच धडे आत्मसात करता येतील. अर्थात, धोनीची भूमिका काय असेल, हे यात विशेष महत्त्वाचे असणार आहे.