सध्या कोरोनाच्या उद्रेकानं सारं जगच धास्तावलं आहे. सानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय करत आहे किंवा दुसऱयाला सुचवत आहे. जगभरातील ‘सेलिब्रिटीज’ याला अपवाद नाहीत. ‘आयर्न मॅन’ या गाजलेल्या हॉलिवुड चित्रपटाची नायिका ग्वेनेथ पाल्ट्रोनं तिला कोरोनावर प्रभावी उपाय माहित असल्याचं सांगितलं आहे. उपवास (इन्टय़ूटिव्ह फास्टिंग), इन्फ्रारेड सोना बाथ आणि ‘किमची कोम्बुआ’युक्त आहार यामुळं कोरोनावर मात करता येते, असं प्रतिपादन तिनं नुकतंच केलं आहे.
अर्थात तिचं हे मत आरोग्य तज्ञांना मुळीच मान्य नाही. कारण या उपायाला अधिकृत पाठबळ नाही. अमेरिकेतील अनेक वैद्यकीय तज्ञांनी तिच्यावर लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे. कोरोना प्रमाणं त्याच्यावरील उपचारांच्या अफवाही वेगानं पसरत आहेत. कोरोना हा गंभीर विकार आहे. त्यासंदर्भात अशा अफवा पसरवणं योग्य नाही. तेव्हा लोकांनीही सावध असावं, असं तज्ञांनी म्हटलं आहे. मात्र पाल्ट्रोचं म्हणणं असं की तिलाही या विकारानं ग्रासलं होतं. तेव्हा तिनं वर सांगितलेला उपाय केला आणि तिचा विकार बराही झाला. त्यामुळं तिचा या उपायावर विश्वास बसला. पण वैद्यकीय तज्ञ म्हणतात की, युटय़ू आदींवर सध्या जो उपायांचा धुमाकूळ सुरू आहे, तो कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक आहे.
सर्वसामान्यानी अर्थातच, सध्याच्या या आव्हानात्मक काळात तज्ञांच्या मतांनुसारच वर्तन करावयास हवं, हे निश्चित. प्रत्येकाचा व्यक्तीगत अनुभव वेगळा असतो. तथापि, आरोग्यरक्षणाच्या संदर्भात धोका न पत्करणं हे केव्हाही चांगलंच.