प्रतिनिधी / वास्को
गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेले ‘आयसीजीएस सार्थक’ हे गस्ती जहाज काल गुरूवारी तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामिल झाले. गोवा शिपयार्ड तटरक्षक दलासाठी बांधीत असलेल्या पाच अपतटीय गस्ती जहाजांपैकी हे चौथे जहाज असून या गस्ती जहाजाचे गोवा शिपयार्डमध्ये आयोजित केलेल्या सोहळय़ात तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन यांच्या हस्ते प्रवर्तीकरण करण्यात आले. यावेळी तटरक्षक दलाच्या पश्चिम कमांडचे महासंचालक एस. परमेश, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोमोडोर बी.बी. नागपाल तसेच भारतीय नौदल व गोवा शिपयार्डचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयसीजीएस सार्थक च्या आगमनामुळे सागरी सुरक्षेच्या कार्यात तटरक्षक दलाचे बळ वाढणार असून आयसीजीएस सार्थक हे तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्डने घालून दिलेले आत्मनिर्भर भारताचे एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. गोवा शिपयार्डने तटरक्षक दलासाठी अशा प्रकारची पाच अपतटीय गस्ती जहाजे बांधण्याची जबाबदारी स्कारलेली असून त्यापैकी हे चौथे जहाज आहे. यापूर्वी तीन गस्ती जहाजे बांधून तटरक्षक दलाकडे सुपुर्द करण्यात आलेली आहेत. पाचवे जहाजही सज्ज झालेले असून लवकरच ते तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. आयसीजीएस सार्थक जहाजाच्या प्रवर्तीकरणासाठी गोवा शिपयार्डमध्ये गुरूवारी सकाळी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयसीजीएस सार्थक हे गस्ती जहाज 105 मिटर लांब असून ताशी 26 सागरी मैल अंतर हे जहाज पार करू शकते. सदर जहाज अत्याधुनिक साहित्य, यंत्रसांमुग्री व शस्त्रे आणि सॅनर्सने सज्ज असून सागरी गस्तीबरोबरच शोध आणि बचाव कार्य, सागरी गुन्हेगारीला प्रतिबंधक तसेच सागरी पर्यावरणाचे सरक्षण करण्याचे कर्तव्यही हे जहाज पार पाडणार आहे. हे जहाज बांधण्यासाठी स्वादेशी कौशल्य वापरण्यात आलेले असून मेक इंन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचे हे जहाज उत्कृष्ठ उदाहरण आहे. या जहाजाचा कायम तळ गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी असणार आहे. या जहाजावर 11 अधिकाऱयांसह 119 खलाशी तैनात असतील. या जहाजाचे जलावतरण मागच्या वर्षी ऑगष्टमध्ये करण्यात आले होते.
या जहाजाच्या प्रवर्तीकरण सोहळय़ात बोलताना महासंचालक के. नटराजन यांनी भारतीय तटरक्षक दल सक्षम सागरी सुरक्षा दल असल्याचे सांगून वाढत्या सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तटरक्ष दल दिवसेदिवस सक्षमपणे विकसीत होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच तटरक्षक बजावत असलेली कामगीरी आणि या दलाचा होत असलेला विकास याबाबतही के. नटराजन यांनी माहिती दिली. देशाच्या सुरक्षा क्षेत्रात गोवा शिपयार्ड बजावत असलेल्या कामगीरीचीही के. नटराजन यांनी प्रशंसा केली.
गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोमोडोर बी.बी. नागपाल यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना आयसीजीएस सार्थकची बांधणी आणि तीचे प्रवर्तीकरण हा गर्वाचा क्षण असल्याचे सांगितले. तटरक्षक दलासाठी पाच गस्ती जहाजांची उभारणी करण्याचा हा प्रकल्प 13 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम गोवा शिपयार्ड नियोजीत वेळेत पूर्ण करीत असून कोविडमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीतही गोवा शिपयार्डने आपले कर्तव्य यशस्वीरीत्या पार पाडल्याचे स्पष्ट केले. या यशाचे श्रेय त्यांनी गोवा शिपयार्ड परीवार व ज्यांची मदत या कार्याला लागली अशा सर्वांना दिले.