आयसीसी बैठकीतील मुख्य मसुदा : कॉलिन गेव्हस अध्यक्षपदासाठी आघाडीवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या नव्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेबद्दल रुपरेषा आखणे हा आज (गुरुवार दि. 25) होणाऱया आयसीसी कार्यकारिणीच्या बैठकीतील मुख्य मसुदा असणार आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सवरुन कार्यकारिणी सदस्यांची ही बैठक होईल.
ऑस्ट्रेलियात यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल, हे आयसीसीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आजच्या बैठकीत त्यासंदर्भात चर्चा अपेक्षित नाही. मात्र, नव्या अध्यक्ष नियुक्तीसाठी निवडीची प्रक्रिया सुरु करण्यावरच मुख्य भर असणार आहे. सध्या आयसीसीचे अध्यक्षपद भारताचे शशांक मनोहर सांभाळत आहेत.
ठोस घोषणेची शक्यता कमी
‘निवडणुकीची किंवा निवडीची तारीख उद्या जाहीर केली जाईल का, याची मला खात्री नाही. पण, आयसीसी अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवरच सारा प्रकाशझोत असेल, हे मी निश्चितपणाने सांगू शकेन’, असे यातील घडामोडींची कल्पना असणाऱया एका आयसीसी कार्यकारिणी सदस्याने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
‘प्रत्यक्ष बैठकीत सर्व सदस्य एकत्रित येतील, त्यावेळी आपल्या देशातील स्थिती काय आहे, याची ते सर्वप्रथम माहिती देतील. अर्थात, या बैठकीत ठोस निर्णय किंवा घोषणा होण्याची शक्यता कमी असेल’, असे या सूत्राने नमूद केले. आयसीसीचे जे ईमेल लीक झाले, त्याची चौकशी कुठवर आली, याचीही यावेळी मंडळाला माहिती दिली जाणे अपेक्षित आहे.
अध्यक्षपदासाठी शर्यतीत असलेल्या सदस्याने किमान दोन कार्यकारिणी बैठकांना उपस्थिती आणि संबंधित देशातील विद्यमान किंवा माजी आयसीसी संचालकाकडून (कार्यकारिणी सदस्य) शिफारस होणे क्रमप्राप्त असणार आहे. आयसीसी कार्यकारिणी मंडळात अध्यक्ष, 12 कसोटी खेळणारे देश, तीन संलग्न सदस्य (मलेशिया, स्कॉटलंड व सिंगापूर), स्वतंत्र महिला संचालिका (इंद्रा नुयी) व मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी मनू साहनी यांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेत मुख्य व्यवस्थापकीय अधिकाऱयाला मतदान करता येत नाही.
न्यायालयाच्या निर्णयाचीही अपेक्षा
सध्याच्या घडीला आयसीसी अध्यक्षपदासाठी ईसीबीचे माजी सर्वेसर्वा कॉलिन ग्रेव्हस आघाडीवर आहेत. पण, तरीही विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांना दुर्लक्षूनही अजिबात चालणार नाही. तूर्तास, गांगुली किंवा बीसीसीआयने त्यांच्या उमेदवारीबद्दल काहीही वक्तव्य केलेले नाही. पण, याचवेळी यापैकी कोणीही उमेदवारीची शक्यता नाकारलेली देखील नाही. अर्थात, बीसीसीआयकडून आलेला कुलिंग ऑफ पिरियड गांगुली व जय शाह यांच्याकरिता रद्द करण्याचा अंतरिम अर्ज भारतीय सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का, यावर बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.
जर सर्वोच्च न्यायालयाने 6 वर्षांच्या कुलिंग ऑफ पिरियडची अट गांगुली यांच्यासाठी शिथिल केली नाही तर अशा परिस्थितीत गांगुली यांनी आयसीसी अध्यक्षपदाच्या रिंगणात उडी घेणेच अधिक बेहत्तर असेल, असा त्यांच्या निकटवर्तियांचा होरा आहे.
एहसान मणींकडून इन्कार
यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणींचे नावही आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. पण, याच आठवडय़ाच्या प्रारंभी त्यांनी स्वतः अशी शक्यता फेटाळून लावली. देशांतर्गत क्रिकेट हा आपला सर्वोच्च प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
सौरभ गांगुली यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर बरीच समीकरणे ठरणार

‘सौरभ गांगुली यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे की नाही, याची आम्हाला अद्याप कल्पना नाही. जर तशी महत्त्वाकांक्षा असेल तर वर्षभरासाठी ते आयसीसीचे अध्यक्ष होऊ शकतील आणि 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे उमेदवार म्हणून उभे ठाकू शकतील’, असे बीसीसीआयमधील सूत्राने येथे नमूद केले.
तूर्तास, केवळ आयसीसी अध्यक्षपदाबाबत विचार करायचा तर बिनविरोध निवड होणार असेल तरच गांगुली यांना या निवड प्रक्रियेत स्वारस्य असेल, असे मानणाराही मोठा गट आहे.