वृत्तसंस्था/ दुबई
सोमवारी आयसीसीची ताजी कसोटी मानांकन यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये कसोटी फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी संयुक्त दुसरे स्थान मिळविले आहे.
कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 911 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनने अलीकडेच विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार द्विशतक झळकावून आपल्या संघाला डावाने विजय मिळवून दिला होता. या कामगिरीमुळे विल्यम्सनने या मानांकनात कोहली समवेत दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या यादीत भारताचा पुजारा सातव्या, इंग्लंडचा स्टोक्स आठव्या, इंग्लंडचा कर्णधार रुट नवव्या तसेच न्यूझीलंडचा लॅथम दहाव्या स्थानावर आहे. भारताचे अजिंक्मय रहाणे अकराव्या तर मयांक अगरवाल बाराव्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या कसोटी अष्टपैलू मानांकनात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला पहिले स्थान गमवावे लागले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत विंडीजला हार पत्करावी लागल्याने होल्डरच्या स्थानामध्ये घसरण झाली असून तो आता 434 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. इंग्लंडचा स्टोक्स 446 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आयसीसीच्या कसोटी अष्टपैलूंच्या मानांकन यादीत भारताचा रविंद्र जडेजा 397 गुणांसह तिसऱया तर रविचंद्रन अश्विन 287 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. भारताचा बुमराह गोलंदाजांच्या मानांकन यादीत नवव्या, अश्विन अकराव्या, मोहम्मद शमी संयुक्त तेराव्या, इशांत शर्मा सतराव्या, रविंद्र जडेजा अठराव्या स्थानावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून ऍडलेड येथे प्रारंभ होणार आहे.