क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी आता जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. आता या स्पर्धेचा जेता 27 मार्चला होणाऱया लढतीनंतर स्पष्ट होणार आहे. काल कोलकातातील किशोर भारती क्रीडांगण मैदानावर झालेला चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब आणि ट्राव यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरी संपली तर गोकुळम केरळने मोहम्मेडन संघाला नमवून आपलीही जेतेपदासाठी दावेदारी पेश केली.
काल गोकुळम केरळने मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबचा पराभव केल्याने चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब, ट्राव आणि गोकुळम केरळ संघाचे 14 सामन्यांतून समान 26 गुण झाले. मात्र केरळने 14 सामन्यांतून 8 विजय नोंदविल्यामुळे ते पहिल्या स्थानावर आहेत. ट्राव दुसऱया तर चर्चिल ब्रदर्स क्लब तिसऱया स्थानावर आहे. आता जेतेपदासाठी 27 मार्चला शेवटचे लीग सामने होणार आहेत. यात चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबची लढत पंजाब एफसी संघाशी तर गोकुळम केरळ आणि ट्राव यांच्यात महत्वाच्या लढती होतील. ट्राव आणि गोकुळम लढत बरोबरीत झाली आणि चर्चिल ब्रदर्स संघ जिंकला तरच चर्चिलला आय-लीगचे जेतेपद मिळू शकते. ट्राव आणि गोकुळम यातील कोणतही संघ जिंकला आणि चर्चिलही जिंकला तर जेतेपद गोलसरासरीवर जाईल.
कालच्या सामन्यात चर्चिल ब्रदर्सच्या क्लेवीन जुनेगा आणि लूका माजसेन आणि ब्राईस मास्कारेन्हसने गोल करण्याच्या सोप्या संधी गमविल्या. ट्रावचा गोलरक्षक अम्रीत गोपे याचे चपळ गोलरक्षणही चर्चिल ब्रदर्सला विजयापासून दूर नेले. सामन्याच्या 27व्या मिनिटाला लूका माजसेनने पेनल्टीवर गोल करून चर्चिल ब्रदर्सला आघाडीवर नेले. त्यानंतर मध्यंतराला दोन मिनिटांचा अवधी असताना ट्रावच्या फाल्गुनी सिंगने बरोबरीचा गोल केला. कल्याणी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोकुळम केरळने मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबला 2-1 गोलांनी पराभूत केले. गोकुळमसाठी डॅनी अँट्वीने दोन तर मोहम्मेडनचा एकमेव गोल सुजीत साधूने केला. त्यानंतर प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या सामन्यात पंजाब एफसीने रियल काश्मीर संघाला चेंचो गिल्टशेनने केलेल्या एकमेव गोलमुळे पराभूत केले. विजयच्या तीन गुणांनी पंजाब एफसीचे 14 सामन्यांतून 22 तर रियल काश्मीरचे 18 गुण झाले आहेत.