
शहरातील शाळांच्या नूतन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला. शाळांची चेकलिस्ट तपासून आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची आता गडबड सुरु झाली आहे. एका शाळेत अर्ज करुन प्रवेशाची वाट न पाहता अनेक नामांकित शाळांचे प्रवेश अर्ज पालकांकडून भरण्यात येत आहेत. यामुळे अर्ज वितरण करण्यात आलेल्या कॉन्व्हेंट शाळा आवारात पालकांची गर्दी दिसून आली. सोमवारी सकाळी मिळणाऱया अर्जांसाठी काही पालकांनी रविवारी पहाटे पासूनच हजेरी लावली होती.
एकदा प्रवेश मिळाल्यानंतर एलकेजी पासून दहावी तसेच पदवीपूर्व पर्यंतच्या शिक्षणाची सोय सदर शाळांमध्ये होत असल्याने आज रांगेत उभारुन त्रास घेऊन प्रवेश मिळविण्यासाठीची धडपड पालकांतर्फे करण्यात आली. अर्ज वितरण प्रक्रिया आठवडाभर चालणार आहे. मात्र पहिल्या दिवशी अर्ज मिळविण्यासाठी पालकांनी शाळा आवारातच मुक्काम ठोकला. यामुळे प्रवेशासाठी पालकांनी शाळा आवरातच दिवस-रात्र घालविली. शाळांनी प्रवेश अर्जाची तारीख, प्रवेश अर्ज वितरणाची वेळ तसेच वयोमर्यादा विविध सूचना शाळा सूचना फलकावर देण्यात आल्या आहेत. याची पालकांनी माहिती घेत, पहिला प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी रांग लावली. आजच्या आधुनिक युगात शाळा प्रवेशाचे महत्त्व व नामांकित शाळेच्या प्रवेशाची चिंता रांगेत उभ्या असणाऱया पालकांवरुन अधोरेखित झाली.
शैक्षणिक वाटचालीची सुरुवात असणारी एलकेजी प्रवेश प्रक्रिया जाहीर होताच पाल्याच्या भविष्यासाठी पालकांची कसरत सुरु झाली. वयाची 3 वर्षे 10 महिने पूर्ण केलेल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांनी शाळा आवारातच मुक्काम ठोकला. शहरातील नामांकित शाळांच्या प्रवेश अर्ज वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला असून सोमवारपासून प्रवेश अर्ज मिळविण्याची लगबग शाळा आवारात अनुभवायला मिळाली. पालकांनी पाल्याच्या एलकेजी प्रवेशासाठी ऊन, तहान, भूक याची तमा न बाळगता 24 तासाहून अधिक काळ रांगेत थांबून प्रवेश अर्ज मिळविला.
रविवारी पहाटे पासूनच रांगेत थांबलेल्या पालकांनी आपली व्यवस्था म्हणून क्रमांकानुसार परस्परांत टोकण वाटले होते. प्रवेश वितरणाला प्रारंभ होताच प्रवेशद्वाराजवळ मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. 24 तासाहून अधिक वेळ रांगेत थांबून उशीरा अर्ज मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. शाळा व्यवस्थापनातर्फे अर्ज वितरणाची व्यवस्था अचूकपणे करण्यात येते. मात्र पालकांकडून प्रथम अर्ज मिळविण्यासाठी आधीपासून रांग लावली जाते. यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शाळा व्यवस्थापनाने टोकण व्यवस्था करावी असे मत पालकांतर्फे व्यक्त करण्यात आले.

चंद्रकांत पवार
आपल्या नातवाच्या प्रवेशासाठी रविवारपासून रांगेत थांबलो आहे. इंग्रजीचे महत्त्व वाढले असल्याने नामांकित शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न आहे. उज्ज्वल भविष्यासाठी तसेच दहावी पर्यंतचे शिक्षण एकाच शाळेत पूर्ण व्हावे या उद्देशाने प्रवेश अर्ज घेत असल्याचे चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
गजानन पाटील
आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर होताच कागदपत्रांची जुळवाजुळव करुन सोमवारी पहाटे पासून रांग लावली. इंग्रजीचे महत्त्व वाढत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या प्रवेशासाठी अशी गर्दी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेश मुळे
पहाटे चार पासून रांग लावली आहे. सर्वांना अर्ज वितरण करण्यात येतील अशा सूचना शाळा व्यवस्थापनाने केल्या आहेत. मात्र पहिला 100 मध्ये अर्ज भरण्यासाठी पालकांची धडपड सुरु आहे. प्रवाहाच्या विरोधात न जात नियमाप्रमाणे रांगेत उभारुन अर्ज मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे राजेश मुळे याने सांगितले.
श्रीनिवास डी.
वयाची 4 वर्षे पार केली की पाल्याच्या शिक्षणाची चिंता लागते. इंग्रजी माध्यम शिक्षण कॉन्व्हेंट स्कूल मधून व्हावे अशी एक इच्छा असते. दर्जेदार इंग्रजी शिक्षणासाठी याच शाळांना पसंती दिली जाते. आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी रांगेत थांबून प्रवेश अर्ज मिळविला असल्याचे श्रीनिवास डी. यांनी सांगितले.
शहनवाज खान
पाल्याला एकदा एलकेजीला प्रवेश मिळाला की महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतची चिंता मिटते. यासाठीच कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठीचा प्रयत्न सुरु आहे. दर्जेदार इंग्रजी शिक्षण या शाळांमधून उपलब्ध होत असल्याने या शाळांना पहिला प्राधान्य असल्याचे मत खान यांनी व्यक्त केले.
राधिका सांबरेकर