गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची मागणी : गोमेकॉत असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात
प्रतिनिधी/मडगाव
कोविडच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर चाचण्या वाढविण्याची गरज असून ’आरटी-पीसीआर’ मशिनद्वारे या चाचण्या होण्याची गरज आहे. गोमेकॉतच असे यंत्र असून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातही असे यंत्र बसवून चाचण्या करण्यात याव्यात तसेच गोमेकॉत असलेल्या सर्व सुविधा जिल्हा रुग्णालयात सुरू कराव्यात, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी उचलून धरली आहे.
फातोर्डातील कदंब बसस्थानकाच्या नजीक वृक्षरोपण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मडगावच्या नगराध्यक्षा पूजा नाईक, अन्य नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र सुविधा कमी पडू लागल्या आहेत. चाचण्या वाढायला हव्यात. कोविड रुग्णांसाठी जिल्हा इस्पितळाचे वरील दोन मजले निगा केंद्र म्हणून वापरात आणावेत तसेच फातोर्डा मतदारसंघातील रुग्णांना तेथे प्राधान्यक्रमाने सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी उचलून धरली.
घरी विलगीकरणात राहणाऱया रुग्णांकडून उल्लंघन
जेथे रुग्णांची सोय करणे शक्मय आहे अशा सर्व सरकारी जागा वापरात आणण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बहुतांश रुग्ण घरीच विलगीकरणात राहण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र अशा रुग्णांची माहिती स्थानिक नगरसेवकांना देण्याची गरज आहे. तसे होताना दिसत नसून असे रुग्ण घराबाहेर पडत असल्याने कोविडचा फैलाव वाढत असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला.