ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मार्चपासून ते जून पर्यंत एकही सुट्टी न घेता शासकीय व खाजगी रुग्णायलातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी काम केले. आज देखील कोरोनाचा धोका संपलेला नसून कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे कोविड लस आल्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोविड लसीसाठी प्राधान्य मिळणार आहे. पुण्यातील आरोग्यसेवकांची यादी राज्याकडे पाठविली जाणार आहे. हाच ख-या अर्थाने हा त्यांचा कार्याचा गौरव असेल, असे पुणे मनपा आरोग्यप्रमुख डॉ.आशिष भारती यांनी सांगितले.
सदाशिव पेठेतील नवा विष्णु चौक नवरात्र मंडळ, बाजीराव रस्ता तर्फे जीवनदायी आरोग्य मंदिराचा सन्मान कार्यक्रमांतर्गत एरंडवण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा गौरव रुग्णालयाच्या आवारात करण्यात आला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ.प्रसाद राजहंस, डॉ.माधव भट, सचिन व्यवहारे, शिरीष याडकीकर यांसह डॉ.ज्योत्स्ना भोसले, डॉ.शेफाली लाजेंकर, कांचन कुंभार, कविता झोरे, दुर्गा पवार यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल देऊन गौरव करण्यात आला.
डॉ.आशिष भारती म्हणाले, कोरोनाच्या या काळात शासकीय व खाजगी रुग्णालयातील सर्वच डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्यसेवा कर्मचारी मोठे काम करीत आहेत. समाजाने त्यांचा गौरव करायला हवा. डॉक्टरांवरील हल्ले होण्याच्या घटना वाढत असतानाच सार्वजनिक नवरात्रोत्सव व गणेश मंडळांनी रुग्णालयाचा केलेला सन्मान सर्वांसाठी आदर्श उपक्रम आहे.